नानक साहिब गुरुद्वारावर हल्ला झालाच नाही, पाकिस्तानचा कांगावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानमधील नानक साहिब गुरुद्वारावर हल्ला झालाच नाही ना तिथल्या कोणत्या शीख धर्मीयाला धमकी देण्यात आली. ती मुस्लिमांच्या दोन गटांमध्ये झालेली हाणामारी असून त्याला जाणूनबुजून धार्मिक रंग दिला जात आहे, असा कांगावा आता पाकिस्तानने केला आहे. शुक्रवारी मुस्लिमांच्या जमावाने नानक साहिब गुरुद्वारावर दगडफेक करत हल्ला चढवला होता.

नानक साहिबमध्ये धार्मिक प्रवचन करणार्‍या शीखाच्या मुलीचे ऑगस्ट महिन्यात अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिचे सक्तीने धर्मांतर करून लग्न लावण्यात आले. या विरोधात शीख समाजाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. याचा राग मनात ठेवून शुक्रवारी मुलीशी लग्न करणार्‍या मुलाच्या मोठय़ा भावाने मोठा जमाव जमवून नानक साहीब गुरुद्वारावर दगडफेक करत हल्ला चढवला. त्याचबरोबर नानक साहिबमधील सर्व शीखांना ठार मारू, अशी धमकीही दिली. व्हिडिओत हा सगळा प्रकार स्पष्ट दिसत असतानाही पाकिस्तान आता त्यावर पडदा टाकत आहे. मात्र, हिंदुस्थानने  कठोर शब्दात या हल्ल्याचा निषेध केला आहे.

उपदेश नको, अल्पसंख्याकांना संरक्षण द्या!

नानक साहिब गुरुद्वारावरील हल्ल्याला 48 तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानातील पेशावर येथे एका शीख युवकाची हत्या करण्यात आली. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानने पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे. नुसतेच उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा तेथील अल्पसंख्याकांना संरक्षण द्या, अशा शब्दांत हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे कान उपटले आहेत. याबाबतचे एक निवेदन जारी करण्यात आले आहे. या हत्याकांडातील दोषींवर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने करण्यात आली आहे. सत्यापासून पळ काढू नका, तेथील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची हमी द्या, अशी मागणीही करण्यात आली आहे.

पाकिस्तान म्हणतो, ते चहावरून झालेले भांडण!

पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी या हल्ल्याला चहावरून झालेले दोन गटांमधील भांडण, असा बनाव केला आहे. गुरुद्वाराजवळच्या चहावाल्याकडे चहा पिण्यासाठी दोन तरुण गेले होते. चहा पिताना त्यातील एका तरुणाला चहात माशी सापडली. त्याचा जाब चहावाल्याला विचारला असता त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यातून दोन गटांत हाणामारी झाली. यात गुरुद्वारा किंवा कोणत्याही शीखाला इजा झाली असल्याचा दावाही गृहमंत्र्यांनी केला आहे.

पेशावरमध्ये शीख तरुणाची हत्या

नानक साहिब गुरुद्वाराचा हल्ला ताजा असताना आता आणखी एका शीख तरुणाची हत्या करण्यात आली आहे. रविंदर सिंग (25) असे या तरुणाचे नाव असून तो मलेशियाहून त्याच्या पत्रकार भावाला भेटायला पाकिस्तानमध्ये आला होता. पेशावरमध्ये खरेदीसाठी गेला असताना अज्ञातांनी त्याची हत्या केली. दरम्यान, या हत्येचा निषेध करून पाकिस्तानने शीख समाजाच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदुस्थानने केली आहे.