
लग्नात कापले जाणारे केक किंवा शॅम्पेन हे आपल्या संस्कृतीचा भाग नाही, असं म्हणत कर्नाटकमधील एका समाजाने त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
विराजपेट कोडावा समाज असं या समाजाचं नाव आहे. कर्नाटकातली कोडागू जिल्ह्यात या समाजातील नागरिकांचं वास्तव्य आहे. नुकतीच त्यांच्या समाजाची 99वी बैठक घेण्यात आली. या बैठकीला वनचिरा ननैया नावाचे त्यांचे अध्यक्ष, 15 इतर संचालक आणि 357 सदस्य हजर होते. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
कोडावा समाजातील लग्नावेळी काही कडक नेमनियम घालून देण्यात आले आहेत. कोडावा समाजातील वराने लग्नावेळी दाढी राखू नये. ज्या महिला नवदांपत्याला आशीर्वाद देण्यासाठी आल्या असतील त्यांनी केस मोकळे ठेवू नयेत. गंगापूजेवेळी फटाके फोडू नयेत. तसंच लग्नानिमित्त केक कापू अथवा शॅम्पेन फोडू नये. फुलांच्या पाकळ्या देखील उडवू नयेत. देवता नावाची एक ट्यून बँडवर वाजवू नये, असे नियम घालून देण्यात आले आहेत.
तसंच, कोडावा समाजातील ज्या मुली आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करतील, त्यांनी विवाहा वेळी घातला जाणारा कोडावा ड्रेस घालू नये तसंच, या वधुला कोडावा पद्धतीचं पथक नावाचं मंगळसूत्र घालण्यापासून मनाई करण्यात आली आहे.





























































