नापास विद्यार्थ्यांची परीक्षा महिनाभरात, रिझल्टवर कोविडचा शिक्का नसणार

अंतिम वर्षाची परीक्षा 1 ऑक्टोबरपासून ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. परीक्षा झाल्यानंतर निकाल 10 ऑक्टोबरपासूनच लागायला सुरुवात होईल. विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर कोव्हिडचा शेरा देण्यात येणार नाही. तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा राहिली तर तातडीने घेणार. त्याचप्रमाणे नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा एका महिन्यात घेण्यात येईल. त्यांनाही पदीवीचे प्रमाणपत्र दिले जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज दिली.

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे संभाजीनगरच्या दौऱ्य़ावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदय सामंत यांनी परीक्षेविषयीची माहिती दिली.

अंतिम वर्षातील 1 लाख 16 हजार 400 विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ 90 ते 92 टक्के विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देतील अशी नोंद विद्यापीठाकडे झाली आहे. तर उरलेले 10 टक्के विद्यार्थी हे स्वत: जवळच्या केंद्रात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी तयार आहेत. त्यासाठी यंत्रणा सज्ज आहे, असे उदय सामंत म्हणाले.

विद्यापीठाचे विभाजन होणार नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे कष्टाने उभारले गेले आहे, राज्य सरकारच्या नावे विरोधक राजकारण करीत आहेत. धाराशिव उपकेंद्र विद्यापीठापासून वेगळे करण्याचा कुठलाही हेतू नाही, तसा सरकारच्या समोर प्रस्तावही नाही, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

पदवी प्रमाणपत्राचा आदर केल्यास कारवाई

पदवीच्या प्रमाणपत्रांवर कोव्हिड 19 असा कोणत्याही प्रकारचा शेरा दिला जाणार नाही. हे पदवीचे प्रमाणपत्र हे गेल्यावर्षीप्रमाणेच दिलं जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनात कोणाताही संभ्रम ठेवू नये. या प्रमाणपत्राचा आदर हा सर्व ठिकाणी पूर्वीप्रमाणे केला पाहिजे. या पदवीकडे जर कोणी बघत नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या