
सामना ऑनलाईन । पणजी
गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत रंगलेल्या राजकीय नाटय़ाने आता सत्ताबदलासाठीच्या हालचाली अधिकच वेगवान झाल्या आहेत. विरोधी पक्ष काँग्रेसने सत्ताबदलासाठी आक्रमक पवित्रा घेतलेला असताना गोव्यातील भाजप खासदारांनी मात्र राज्यातील नेतृत्वबदलाबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती दिल्लीत पक्षाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेऊन राज्यात परतल्यावर दिली.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, शहर विकास मंत्री फ्रान्सीस डिसोझा आणि ऊर्जा मंत्री पांडुरंग मडकईकर हे तीन ज्येष्ठ मंत्री आजारपणामुळे विधानसभेच्या कामकाजात भाग घेऊ शकत नाहीत. पर्रीकर दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात शनिवारी उपचारासाठी दाखल झाल्यावर विरोधी काँग्रेसने राज्यात सत्तापालट घडविण्याच्या हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. काँग्रेसने भाजपने विशेष अधिवेशन घेऊन विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट देऊन केली आहे.






























































