रायगड जिल्ह्यात धबधब्यांवर पर्यटकांना नो एन्ट्री!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कर्जत

रायगड जिल्ह्यात पावसाळ्यात पर्यटनासाठी अतिशय चांगले वातावरण असते आणि याचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक कर्जत मध्ये पर्यटनासाठी येत असतात. रायगडमधील कर्जत येथे डोंगर दऱ्यात असलेले धबधबे, धरणे, रिसॉर्ट याचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटकांचा लोंढा दर शनिवारी आणि रविवारी कर्जतमध्ये येत असतो. परंतु गेल्या काही वर्षात या धरणांवर आणि धबधब्यांवर अनेक अपघात होऊन अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडली असल्याने जिल्हा प्रशासनाने यामधील काही स्थळांवर पर्यटकांना सुरक्षेच्या दृष्टीने जाण्यास मनाई असल्याचा फतवा काढला आहे. ही बंदी ४ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे.

कर्जतमधील पावसाळी पर्यटन गेल्या काही वर्षांपासून चांगले वाढले असून याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक कर्जतकडे वळू लागले आहेत. पावसाळ्यातील आनंद लुटण्यासाठी लोणावळा किंवा महाबळेश्वरला जाण्यापेक्षा तेच वातावरण कर्जतमध्ये अनुभवयाला मिळत असल्याने मुंबईमधील अनेक पर्यटकांचा ओघ कर्जतकडे वळला आहे. त्यामुळे येथील स्थानिकांना सुद्धा रोजगार उपलब्ध मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे. परंतु गेले एक दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर पर्यटक आल्याने आणि त्यातील अतिउत्साही पर्यटकांमुळे अनेक अपघात सुद्धा या भागात होऊन अनेक जणांचे बळी जाण्याचं घटना घडली असल्यामुळे तालुका प्रशासनाने सोलनपाडा, पाली भूतवली, खांडस, कशेळे, अवसरे, साळोख, पाषाणे, खांडपे या धरणांवर तर आषाणे, जुमापट्टी, बेडीसगाव, आनंदवाडी, टपालवाडी, कोंदिवडे, वदप या धबधबांवर तसेच पेठ आणि पेब किल्यांवर प्रशासनाने १४४ कलम लावले असून पाचपेक्षा अधिक जण एकत्र आल्यास त्यांच्यावर १४४ कलमाखाली कारवाई पोलीस प्रशासन करणार आहे.