
ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्य़ा विद्यार्थ्यांना यंदाही दिवाळीची सुट्टी मिळणार आहे. शाळांच्या दिवाळी सुट्टीचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईनच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षकही या प्रक्रियेत गुंतले आहेत. या अभ्यासातून विद्यार्थी शिक्षकांना थोडी उसंत मिळण्यासाठी लवकरच दिवाळी सुट्टीची घोषणा करण्यात येणार आहे. दिवाळी सुट्टीच्या काळात शाळांनी कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये, अशा सूचनाही वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.
अकरावी प्रवेशाबाबत निर्णय होईल
अकरावी प्रवेशाबाबत राज्य सरकार महाअभिवक्ता व संबंधित यंत्रणेशी चर्चा करूनच लवकरात लवकर निर्णय घेईल, असेही यावेळी शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. अकरावीचे कॉलेज सुरू व्हावे याला राज्य सरकार प्राधान्य देत आहे. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे विलंब होत असल्याचे त्या म्हणाल्या. अकरावीच्या ऑनलाईन वर्गाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे याबद्दल शिक्षणमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

























































