
सामना प्रतिनिधी । पणजी
मडगाव येथील घाऊक मासळी बाजारात बाहेरील राज्यातून मासळी घेऊन आलेल्या १७ ट्रकमधील मासळीची धाड टाकून केलेल्या तपासणीचा निषेध म्हणून मडगाव,पणजी आणि म्हापसा शहरातील मासळीचे घाऊक आणि किरकोळ बाजार बंद करण्यात आल्याने गोव्यात मासळी संकट निर्माण झाले आहे.
गोव्यात सध्या मासेमारी बंद असल्याने बहुतेक सगळी मासळी शेजारील महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, केरळ आणि कर्नाटक मधून आयात केली जाते. परराज्यातुन आयात केलेली मासळी साठवून ठेवण्यासाठी आरोग्यास हानिकारक असे रसायन वापरले जात असल्याची माहिती मिळाल्या नंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने आज पहाटे मडगाव येथील घाऊक मासळी बाजारात परराज्यातुन मासळी घेऊन आलेल्या १७ ट्रकांमधील मासळीची तपासणी केली. त्यात आरोग्यास हानिकारक रसायन वापरले असल्याचे आढळून आले. मासळी साठवून ठेवण्यासाठी Formalin नावाचे रसायन वापरले जात असल्याच्या बातम्या आणि स्थानिकांच्या तक्रारी आल्या नंतर आज पहाटे ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईचा निषेध म्हणून मडगाव, पणजी आणि म्हापसा येथील मासळीचे घाऊक आणि किरकोळ बाजार बंद ठेवल्यामुळे मत्स्यप्रेमी गोवेकरांचे हाल झाले आहे. ३१ जुलै पर्यंत गोव्यात मासेमारी बंदी असल्याने गोवेकरांना मासळी साठी शेजारील राज्यांवर अवलंबून रहावे लागते. आजचे प्रकरण चिघळले तर गोवेकरांचे हाल होणार आहेत. मडगाव मधील मासळी विक्रेत्यांनी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे त्यांच्या समोर मांडले आहे.


























































