शहापूर तालुक्यात एकही आयसीयू नाही: रुग्णांचा जीव टांगणीला, ग्रामीण भागात सरकारची आरोग्य यंत्रणाच व्हेंटीलेटरवर

आरोग्यावर सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करीत असल्याचा दावा नेहमी केला जातो. पण प्रत्यक्षात चित्र मात्र उलट असल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागात तर सरकारची आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर असून शहापूर तालुक्यात एकही आयसीयू नाही. त्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. औषधांची कमतरता, डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी यांची वानवा यामुळे शहापूरच्या सरकारी रुग्णालयाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. अतिदक्षता विभाग नसल्यामुळे रुग्ण तसेच नातेवाईकांची फरफट होत असून आतापर्यंत अनेकांना जीवालाही मुकावे लागले आहे.

खासगी रुग्णालयांचे दर परवडत नसल्यामुळे गोरगरीब रुग्ण सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घेतात. साप तसेच विंचू दंशाचे रुग्णदेखील मोठ्या प्रमाणावर येथील रुग्णालयात येत असतात. पण अतिदक्षता विभागच नसल्याने त्यांची परवड होते. प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णांना ठाणे, कल्याण तसेच मुंबईपर्यंत धाव घ्यावी लागते. गेल्या काही दिवसांत रस्त्यातच रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत.

रिक्त पदे त्वरित भरा
शहापूर येथील रुग्णालयात फिजिशियन, पेडिअॅट्रिक, गायनोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, अनेस्थेतजिस्ट, फिजोलॉजिस्ट, फॉरेन्सिक आदी तज्ज्ञांची पदे मंजूर असूनही भरलेली नाहीत. ही पदे त्वरित भरावीत तसेच तातडीने अतिदक्षता विभाग सुरू करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख विजय देशमुख यांनी केली आहे.

3 लाख लोकसंख्या व 43 किलोमीटरचे कार्यक्षेत्र असलेल्या शहापूर तालुक्यात 228 गावे 365 पाडे, 107 ग्रामपंचायती, 2 ग्रामदान मंडळ, 1 नगरपंचायत आहे.
आरोग्य सेवेसाठी शहापूर, खर्डी येथे उपजिल्हा रुग्णालय व 9 प्राथमिक आरोग्य केंद्रे किन्हवली, अघई, डोळखांब, कसारा, शेंदुर्ण, शेणवा, टाकीपठार, टेभा, वासिंद अशी आरोग्यसेवा कार्यरत आहे.
शहापूर तालुक्यात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यांना तत्काळ उपचार मिळणे गरजेचे असते. पण सरकारी रुग्णालयात अतिदक्षता विभाग नसल्याने रुग्णांना दुसरीकडे हलवावे लागते.
शहापूर उपजिल्हा रुग्णालय येथे अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर व अत्याधुनिक साहित्याची मागणी वरिष्ठांकडे करण्यात आली आहे. – डॉ. आशिलाक शिंदे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक