तुंगी गावातील नागरिकांचे मुलभूत सोयी सुविधांपासून प्रचंड हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कर्जत

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असूनही कर्जत तालुक्यात अनेक गावे मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत. त्यातील उंच डोंगर माथ्यावर वसलेल्या तुंगी या गावाची भयानक अवस्था आहे. स्वातंत्र्य मिळूनही जीवनावश्यक सुविधांसाठी येथील नागरिकांचा आक्रोश आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे मुलभूत सोयी सुविधांपासून प्रचंड हाल होत आहेत.

कर्जत तालुक्यातील उंच डोंगर माथ्यावर वसलेले जेमतेम साडेपाचशे लाकवस्तीचे हे तुंगी गाव. शिवकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा अंगावर मिरवणार्‍या आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावाला मात्र शासकीय लाल फितीमुळे शापित जीवन जगावे लागत आहे. गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते. अनेकदा तर पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालवावा लागतो. पाण्यासाठीची ही ससेहोलपट तुंगीच्या नशिबी अनेक वर्षांपासून आहे.

शासन हागणदारी मुक्तीच्या घोषणा करते पण तुंगी सारख्या गावात प्यायला पाणी नाही, तिथे शौचालयाची काय बात… त्यामुळे तुंगीसाठी हागणदारीमुक्ती म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात. शेती हे एकमेव रोजगाराचे साधन. पण आता शेतीवर गुजराण होत नाही म्हणून अनेकजण मोलमजुरीसाठी अन्यत्र जातात. तुंगीला ये-जा कारण्यासाठी धड रस्ता नाही. त्यामुळे नागरिकांना आपल्या सामानाची ने-आण स्वतःच करावी लागते. गावात जर कोणी आजारी झाले तर झोळीत टाकून दवाखाना गाठावा लागतो. रस्त्याअभावी तुंगीकरांना या मरणयातना सोसाव्या लागत आहेत. विकासाचा सूर्योदय तुंगीमध्ये झालाच नाही अशीच परिस्थिती येथे आहे.

गावात जेमतेम चौथीपर्यंत शाळा. गावात शिक्षणाचे महत्व समजल्याने मुले अन्यत्र जाऊन शिकली, मोठी झाली. महसूली नकाशावर तुंगी हे नाव असले तरी शासनाच्या योजनांमधून मात्र गायब असते. याला अपवाद फक्त खासदार श्रीरंग बारणे यांचा. गावात कायम अंधार असायचा. या गावातील अंधार दूर व्हावा आणि गावात वीज पोहचावी यासाठी गावातीलच सामाजिक कार्यकर्ता दिनेश भोईर याने खासदारांकडे ही व्यथा मांडली. त्यांनी देखील हा विषय लावून धरला आणि तुंगी मध्ये वीज पोहचली. गाव उजळून निघाले.

कर्जत तालुक्यातील रस्त्यांना तुंगी रस्त्याने जोडले जावे, गावात पिण्याचे पाणी पोहचावे, शिक्षण आणि आरोग्याची सुविधा निर्माण व्हावी आणि मायबाप सरकारने हे प्रश्न सोडवावेत एवढी या गावातील नागरिकांची किमान अपेक्षा आहे. आमच्या पाच पिढयांपासून पिण्याचे पाण्याचे हाल कोणाला समजलेच नाही. पुरूषांना मदतीने आम्हाला पाणी भरावे लागते. व गढूळ पाण्यात तुरटी फिरवून प्यावे लागते. गावात आरोग्य, शिक्षण, रस्त्याची गैरसोय आहे. शासन आमच्या समस्या जाणूनच घेत नसल्याने आमचे प्रचंड होल होत आहेत,असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.