पुणे तेथे आता नोकरीच उणे! इंजिनिअर लावतोय पानाला चुना

3364

आर्थिक मंदीचे चटके महाराष्ट्रातील सर्वात मोठे ‘पुणे ऑटो हब’ला बसत आहेत. शेकडो तरुण बेरोजगार झाले असून, नोकरीच्या शोधात वणवण भटकत आहेत. बी. टेक. इंजिनीयर तरुणावर तर पानाला चुना लावण्याची वेळ आली आहे.

देशभरात वाहन उद्योगात मोठी मंदी आहे. वाहन उद्योगातील अनेक कंपन्यांकडून उत्पादन काही दिवस बंद केले जात आहे. त्यामुळे अनेक इंजिनीयर्स, कामगारांच्या नोकऱयांवर गदा आली आहे. भोसरी येथील शाहरूख शेख हा बी.टेक. इंजिनीयर ऑटोमोबाईल कंपनीत नोकरी करीत होता. दोन महिन्यांपूर्वी त्याची नोकरी गेली. शेख आता भोसरी मार्केटमध्ये पानाची टपरी चालवितो. त्याची आई येथे काम करायची. आता बी.टेक. झाल्यानंतरही शाहरूख शेखवर ही वेळ आली आहे.

दोन महिन्यांपूर्वी कंपनीने काँट्रक्ट रिनिव्ह केले नाही आणि कामावरून काढले. त्यानंतर 60 वर कंपन्यांमध्ये मी रिझ्युम (सी.व्ही.) घेऊन गेलो, पण नोकरी मिळाली नाही. सगळीकडे स्लो डाऊन सुरू आहे असे शेखने सांगितले.

कंपन्या रिझ्युमही घेत नाहीत
तुषार सर्वदे आणि त्याचे चार मित्र जळगावहून पुण्यात आले. सर्वजण मेकॅनिकल इंजिनीअर आहेत. नोकरीच्या शोधात वणवण भडकत आहेत. कंपन्यांच्या गेटवरसुद्धा त्यांचा रिझ्युम घेतला जात नाही. आमच्या कर्मचाऱयांचीच संख्या कमी करणार आहोत. नवीन स्टाफ घेणार नाहीत असे या तरुणांना कंपन्यांकडून सांगितले जात आहे.

काय आहे पुणे ऑटो हब?
पुणे ऑटो हब मध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण हा परिसर येतो. या हबमध्ये टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज, बॉश, फोक्सवॅगन, जग्वार, लँड रोवर, जनरल इलेक्ट्रिक यासारख्या अनेक बडय़ा कंपन्या आणि शेकडो लहान उद्योग आहेत. या ‘पुणे ऑटो हब’वर हजारो लोकांची उपजीविका अवलंबून आहे. मंदीमुळे ऑटो हबमध्ये काम करणारे हजारो कामगार, इंजिनीअर्स चिंतेत आहेत. तुषार सर्वदे आणि त्याचे चार मित्र जळगावहून पुण्यात आले. सर्वजण मॅकॅनिकल इंजिनीयर आहेत. नोकरीच्या शोधात वणवण भटकत आहेत. कंपन्यांच्या गेटवरसुद्धा त्यांचा रिझ्युम घेतला जात नाही.

10 लाख नोकऱ्या संकटात
सोसायटी ऑफ इंडस्ट्री बॉडी ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियानुसार कंपन्यांचे उत्पादन 15 ते 20 टक्क्यांनी कमी झाले आहे. 3 लाख लोकांच्या नोकऱया गेल्या आहेत. ऑटो डीलरशिप बंद होत असल्याने 10 लाख लोकांच्या नोकऱ्या संकटात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या