दिवाळीत पावसाचा कंदीलब्लॉक

यंदा दिवाळी आली तरीही पावसाने राज्यभरातून काढता पाय घेतलेला नाही. त्यामुळे घराबाहेर तसेच रस्तोरस्ती मोठमोठाले कंदील लावणार्‍या मंडळांचीही गोची झाली आहे. कंदील लावलाच तर शॉर्टसर्किट होण्याचा धोका आहे. त्यामुळे यंदा मंडळांचेही कंदील जमिनीवरच असणार आहेत. अनेकांनी घराबाहेरही कंदील लावण्याचा इरादा बदलला आहे.

प्रभादेवीच्या सौरभ मित्र मंडळाचा कंदीलही यंदा लागणार नाही. पाऊस आलाच तर शॉर्टसर्किट होऊन दुर्घटना घडू शकते. त्यामुळे आम्ही कंदील लावणार नसल्याचे मंडळाच्या रमेश भालेकर यांनी सांगितले. अनेकजण घरच्या घरी आकर्षक कंदील तयार करतात आणि खिडकीत किंवा दरवाजाबाहेर लावत असल्यामुळे दिवाळीत झगमगाट दिसतो, पण यंदा हा झगमगाट दिसणार नाही. जणू काही ऐन दिवाळीत पावसाचा कंदीलब्लॉक असणार आहे.

ऐन दिवाळीत पाऊस असल्याने घराबाहेर लावल्या जाणार्‍या विजेच्या आकाश कंदिलात पाणी गेल्यास शॉर्ट सर्किट होऊ शकते. त्यामुळे  नागरिकांनी आकाश कंदिलासाठी चांगल्या दर्जाची जोड नसलेली वायर वापरावी. तसेच आकाश कंदिलात पाणी जाऊ नये म्हणून त्याच्या वरील बाजूस प्लॅस्टिकचे आवरण लावावे. भारत जाडकर, मुख्य महाव्यवस्थापक प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र (महावितरण)

आपली प्रतिक्रिया द्या