
मृतांना दफन करण्यासाठी जागा नसल्याने उत्तर प्रदेशातील 18 बंजारा समाजातील मुस्लीम कटुंबासह हिंदु धर्मात परतले आहेत. आमच्या समाजाने पूर्वीपासून मृतदेहांना दफन करण्यासाठी जागा मिळावी म्हणून संघर्ष केला आहे. मृतदेहांना दफन करण्यासाठी जागा नसल्याने आमच्या समाजाने काही वर्षांपूर्वी मुस्लीम धर्म स्वीकारला होता. मात्र, त्यानंतरही आमच्या समाजातील मृतांचे दफन करण्यासाठी जागा मिळाली नाही. त्यामुळे हिंदू धर्मात परतण्याचा निर्णय घेतल्याचे हिंदू धर्मात परतलेल्यांनी सांगितले.
आपल्या वडिलांनी इस्लामचा स्वीकार केला, तेव्हा आपण 13 वर्षांचे होतो, असे मोहम्मद रशीदने सांगितले. आपण कांढला येथील बंजारा समाजातील आहोत. आमच्या समाजातील मृतांना पुरण्यासाठी जमीन मिळावी म्हणून आम्ही नेहमी संघर्ष केला आहे. मृतदेहांनी पुरण्यासाठी जागा मिळावी म्हणून त्याकाळी इस्लाम धर्म स्वीकारणे हा एकच मार्ग होता. त्यामुळे सुमारे 12 वर्षांपूर्वी आमच्या समाजाने तेच केले, असे रशीदने सांगितले. मात्र, इस्लाम स्वीकारल्यानंतरही आमचा प्रश्न तसाच राहिला. आता,आमच्या समाजातील मृतांसाठी जमीन देण्याचे वचन मिळाल्याने आमच्या समाजातील 18 बंजारा मुस्लिमांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आहे. या समाजातील आणखी 200 लोकांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितले.
25 वर्षांच्या रशीद धर्मातरानंतर आता विकास कुमार झाला आहे. त्याने सांगितले की, मंदिरातील लोकांनी आमच्या समाजातील मृतांना दफन करण्यासाठी जमीन देण्याचे वचन दिले आहे. आमच्या समाजातील मृतदेहांना दफन करण्यासाठी जागा नसल्याने माझे वडील उमर अहमद यांनी इस्लाम स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तोच एक मार्ग होता. आता आम्ही आमचा निर्णय घेत पुन्हा स्वधर्मात परतण्याचा निर्णय घेतला आहे.
रशीद आणि या समाजातील 13 कुटुंबिय सूरजकुंड मंदिरात शुद्धी समारंभ झाल्यावर 4 ऑगस्ट रोजी हिंदू धर्मात परतले आहेत. रशीदची पत्नी मंजू बानोनेही चार मुलांसह हिंदू धर्मात प्रवेश केला. रशीदचे भाऊ आदिल आणि दीपकही कुटंबासह हिंदू धर्मात परतले आहेत. हा शुद्धी समारंभ करणाऱ्या पुजारी यशवीर महाराज यांनी सांगितले की, “आम्ही त्यांना नेहमी भेटत होतो आणि त्यांना पुन्हा हिंदू धर्मात परतण्याबाबत समजावत होतो. त्या काळात गरज आणि दुसरा पर्याय नसल्याने तुम्हांला इस्लाम स्वीकारावा लागला होता. त्यानंतरही तुम्हाला मृतदेहांसाठी जागा मिळालेली नाही. त्यामुळे स्वधर्मात परत आल्यास ही समस्या सुटेल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे.
शामलीच्या न्यादंडाधिकारी जसजीत कौर यांनी सांगितले की, कायद्यानुसार धर्मांतरण अजून व्हायचे आहे. या प्रकरणात जबरदस्तीने धर्मातर करण्याचे दिसून येत नाही. हिंदू धर्मात परतण्याची त्यांची इच्छा असल्यानेच त्यांनी हिंदू धर्म स्वीकारल्याचे सांगितले. मंजू बानो आता मंजू देवी झाल्या आहेत त्यांनी सांगितले की, हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर आमच्या समाजाचा मृतदेहांसाठी जागा मिळण्याचा प्रश्न सुटेल, असा आम्हाला विश्वास आहे.
येथील बंजारा समाजाचे काही वर्षांपूर्वी सक्तीने धर्मांतर करण्यात आले होते. त्यांची भेट घेत त्यांना स्वधर्मात परतण्याचे आवाहन केले. तसेच त्यांची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. तसेच स्वधर्मात परतण्याचे महत्त्व समजावले. त्यानंतर त्यांनी स्वधर्मात प्रवेश केला आहे. यात सक्तीने किंवा जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आलेले नाही. येथील अनेक कटुंबांचे काही वर्षांपूर्वी सक्तीने धर्मांतर करण्यात आले होते. त्यांनाही पुन्हा स्वधर्मात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रीय स्वंयसेवक संधाकडून सांगण्यात आले.





























































