थातूरमातूर ‘पॅकेज’ची घोषणा नको! हेक्टरी ५० हजार आणि कर्जमाफी करा, उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकरी त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसानभरपाई आणि संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी. उगाच थातूरमातूर घोषणा करून जाऊ नये, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदी हे ८ आणि ९ ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर येत असून ते विविध विकासकामांची उद्घाटने करणार आहेत, पण मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान कोणते विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहेत त्याकडे महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याचा लाभपूरग्रस्त शेतकऱ्यांना व्हायला हवा असे सांगून शिवसेना पक्षप्रमुखांनी ठणकावले की, “संपूर्ण मराठवाडा आजही चिखलात आणि पाण्यात आहे. पिके, घरे, पशुधन तर गेलेच; पण जमीन साफ खरवडून गेली त्यावर किमान दोन पिढ्या पीक घेता येणार नाही. ४० लाख शेतकरी, ६० लाख एकर शेतीला पुराचा फटका बसला असून पंतप्रधानांनी ‘पॅकेज’ची धूळफेक न करता हेक्टरी ५० हजार थेट मदत आणि कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करावी. पुराच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आताच मदतीचा हात दिला नाही तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तीन पिढ्या नष्ट होतील. पूरग्रस्त शेतकऱ्यांतर्फे पंतप्रधानांना मी हात जोडून नम्र विनंती करीत आहे की, थातूरमातूर घोषणा न करता शेतकऱ्यांना जे हवे तेच द्या!”