
हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज आणि ब्लॉकबस्टर सामन्यासाठी हिंदुस्थानी चाहते बॅण्डबाजा आणि तिरंग्यासह वाजतगाजत नाचत आले. पण पाकिस्तानी संघाचा एकही पाठीराखा स्टेडियमध्ये सोडा, मोटेराच्या आसपासही दिसला नाही. त्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांविनाच पाकिस्तानी संघाला मैदानात उतरावे लागले आणि खेळावे लागले. एकीकडे किमान 20 हजार तिरंगे मोदी स्टेडियमवर फडकत होते, तर दुसरीकडे पाकिस्तानचा एकही चांदतारा दिसला नाही.
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील कटू संबंधांमुळे पाकिस्तानी नागरिकांना सुरक्षिततेच्या कारणास्तव अद्याप व्हिसा दिला गेला नाही. शेकडो पाकिस्तानी नागरिकांनी वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानी सरकारकडे व्हिसाची मागणी केली होती. मात्र एकालाही व्हिसा दिला गेला नाही. तसेच केवळ सातच पाकिस्तानी पत्रकारांना वर्ल्ड कपसाठी व्हिसा दिला मिळू शकला. वर्ल्ड कपच्या कव्हरेजसाठी पन्नासपेक्षा अधिक पाकिस्तानी पत्रकारांनी व्हिसाची मागणी केली होती, पण त्यांनाही व्हिसा मिळू शकला नाही. त्यामुळे आपल्या चाहत्यांविना खेळताना पाकिस्तानी खेळाडूंवर खूप मोठा दबाव जाणवत होता. अहमदाबादमध्ये पाकिस्तानी संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले असले तरी आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी किंवा त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी एकही पाठीराखा मैदानात नव्हता. केवळ मैदानात आयसीसीच्या वतीने हिंदुस्थानचा ‘जीतेगा इंडिया’ आणि पाकिस्तानचा ‘पाकिस्तान की शान’ असे दोन झेंडे फडकावले जात होते.

























































