पार्किंगचा नाही पत्ता अन् दंडाचा सपाटा; उल्हासनगरात ट्रक टर्मिनल स्टेशन उभारण्याची मागणी

उल्हासनगर शहरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने अनेक ट्रक, टँकरचालक जागा मिळेल तिथे गाड्या उभ्या करतात. मात्र वाहतूक पोलीस दंडाचा सपाटा लावत असल्याने वाहनचालक आणि व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. याची गंभीर दखल घेत ट्रक-टैंकर वेल्फेअर असोसिएशनने पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेत ट्रक टर्मिनल स्टेशन उभारण्याची मागणी केली आहे.

शहरात दररोज जवळपास २५० ते ३०० अवजड वाहने दररोज ये-जा करतात. ही वाहने राज्य, देशातील विविध शहरातून माल घेऊन येतात. मात्र या वाहनांसाठी शहरात कायमस्वरूपी पार्किंगची जागा उपलब्ध नसल्याने वाहनचालक मिळेल त्या जागी आपली वाहने पार्क करतात. असे असताना वाहतूक पोलीस त्यांच्या वाहनांवर भरमसाट दंड आकारतात. त्यामुळे चालक हैराण झाले आहेत. पत्नी रुग्णालयात अत्यवस्थ असल्यामुळे धंदा बुडवून वाहन तीन दिवस एकाच जागी थांबलेल्या चालकावर तब्बल १७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचे समोर आले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिकेने ‘ट्रक टर्मिनल’ उभारावे अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद टाले, ट्रक-टँकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष कुलविंदरसिंग बैस यांनी आयुक्तांकडे केली आहे. यावेळी उपाध्यक्ष मस्तराम धिमाण, सचिव प्रमोद शिंदे आदी उपस्थित होते.

प्रस्ताव प्रलंबित
विठ्ठलवाडी येथील अंब्रोसिया हॉटेलमागे असलेली सुमारे आठ एकर जागा उपलब्ध आहे. माजी नगरसेवक प्रमोद टाले यांनी यापूर्वी महापालिकेच्या महासभेत याच जागेवर ट्रक टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र हा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे. हीच जागा निश्चित करून ट्रक टर्मिनल उभारण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. शहरात ट्रक टर्मिनलचा आणि पार्किंगचा प्रश्न निकाली निघेपर्यंत पोलीस वाहतूक विभागाने अवजड वाहनांवर होणारी दंडात्मक कारवाई थांबवावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.