सुरक्षेच्या उपाययोजना केल्याशिवाय बांधकाम परवाने देऊ नका! नगरविकास राज्यमंत्र्यांचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

इमारतीला लागणाऱया आगी तसेच इमारत दुर्घटनांबाबत वास्तुविशारद, संरचनात्मक अभियंत्यांवर जबाबदाऱया निश्चित कराव्यात. जर सुरक्षाविषयक सर्व प्रकारच्या उपाययोजना तसेच सल्लागारांच्या नेमणुका केल्याशिवाय बांधकामांचे कोणतेही परवाने तसेच ओसी दिल्या जाऊ नयेत असे निर्देश नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज दिले.

मुंबई वगळता राज्यातील इतर ठिकाणच्या इमारत बांधकामासंदर्भातील नव्याने तयार करण्यात येत असलेल्या बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीत करण्याच्या सूचना नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिल्या. तसेच सुरक्षाविषयक सर्व प्रकारच्या उपाययोजना व सल्लागारांच्या नेमणुका केल्याशिवाय कोणत्याही बांधकामांच्या परवाने अथवा पूर्णत्वाचा दाखला देऊ नये, असे निर्देशही डॉ. पाटील यांनी दिले.

नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडे आज झालेल्या बैठकीत याविषयीचे निर्देश देण्यात आले. नक्याने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी अपघात घडल्यानंतर कोणावर जबाबदारी निश्चित करावी यासंबंधी नियमावली तयार करावी. या सूचनांचा समावेश नव्याने तयार करण्यात येत असलेल्या बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीमध्ये करावा. भविष्यात एखाद्या बांधकामावर दुर्घटना झाल्यास पाच सदस्यांची तांत्रिक समिती नेमून नवीन होणाऱ्या नियंत्रण नियमावलीनुसार जबाबदारी निश्चित करून अहवाल द्यावा. त्यानंतर संबंधितांवर कार्यवाही करावी, अशी विनंती इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनीयर संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीची नोंद नवीन नियमावलीत घेण्याच्या सूचना रणजीत पाटील यांनी दिल्या.