
माघी गणेशोत्सव 15 फेब्रुवारीपासून सुरू होत असून यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव साधेपणानेच साजरा करावा. कोणतीही मिरवणूक न काढता गणेशोत्सव मंडळांनी महापालिका तसेच स्थानिक प्रशासनाच्या परवानगीनेच गणेशोत्सव साजरा करावा असे निर्देश देण्यात आले आहेत.
माघी गणेशोत्सव 2021च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारावेत, आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे. मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरता 4 फूट आणि घरगुती गणपती मूर्तीची 2 फूटांच्या मर्यादेत असावी. शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर मूर्तींचं पूजन करावं. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे, सांस्कृतिक कार्य्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरं आयोजित करावी. तसंच श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क इत्यादीद्वारे उपलब्ध करावी.
गणपती मंडपात निर्जंतुकीकरणाची आणि थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी. मंडपात एकावेळी 10 पेक्षा जाता कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसंच एकावेळी फक्त 15 भाविकांना दर्शनासाठी प्रवेश द्यावा. मूर्ती विसर्जनाच्या वेळी जास्तीत जास्त 5 कार्यकर्ते असावेत, अशा मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.




























































