मनसे आणि भाजपमध्ये युतीचा प्रस्ताव नाही, देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Devendra fadanvis chief minister maharashtra

राज्यात मनसे आणि भाजप यांच्यात कोणत्याही प्रकारच्या युतीच्या प्रस्ताव नाही, याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. यासंदर्भात आलेल्या बातम्या या अपरिपक्व असल्याचे स्पष्टीकरण विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

भायखळा रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, मनसेसोबत युतीच्या चर्चा कपोलकल्पित आहे. मनसेकडून कोणताही प्रस्ताव नाही, आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. पण एक मात्र नक्की आहे अलीकडच्या काळात राज ठाकरेंनी ज्या भूमिका घेतल्या आहेत त्यातील बहुतांशी भूमिकांना म्हणजे ती हिंदुत्वाची असो किंवा लाऊडस्पीकर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार लावायला पाहिजे, या आमच्याही भूमिका राहिलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही ज्या भूमिका मांडतो आहे त्याच भूमिका राज ठाकरे मांडत आहेत, पण अजूनही आमची फॉर्मल चर्चा झालेली नाही. त्यामुळे आता त्यावर जे कमेंट येत आहेत त्या फारच अपरिपक्व अशा आहेत, अशा शब्दांत फडणवीस यांनी युतीची शक्यता फेटाळून लावली आहे.

अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनाने परिस्थिती बिघडत आहे

‘सबका साथ-सबका विकास’, ‘सबका विश्वास आणि सबका प्रयास’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे. मोदींच्या योजना सर्वांना लागू आहेत, पण काहीजण मतांच्या राजकारणासाठी अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करतात त्यामुळे आज हिंदुस्थानात परिस्थिती बिघडत आहे, असे फडणवीस म्हणाले.