आणखी आठवडाभर पाऊस नाही, हवामान खात्याने वर्तवला अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुरूवातीलाच चांगली बॅटिंग करणारा पाऊस येत्या 9 जुलैपर्यंत विश्रांती घेण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात आठवडाभर पाऊस होणार नाही. पावसाचे आगमन जोरदार झाल्याने शेतकरीवर्गाने पेरणीला सुरूवात केली होती. ते आता चिंतेत पडले आहेत. 9 जुलैपासून 15 जुलैपर्यंत मात्र चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गडगडाटासह चांगला पाऊस झाला. परंतु येत्या आठवडय़ात त्याचे प्रमाण फारच कमी असेल असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. 30 जूनपर्यंत राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होईल. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीही होईल असा वेधशाळेचा अंदाज होता. कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र आता त्याचा जोर मंदावला आहे. काही जिह्यांमध्ये ढग दाटून येऊनही पाऊस होत नसल्याचे दिसून येत आहे. विश्रांती घेणारा पाऊस 9 जुलैपासून पुन्हा सक्रीय होईल. दरम्यानच्या काळात विदर्भ, मराठवाडय़ातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.