आणखी आठवडाभर पावसाचा पत्ता नाही! मुंबईकरांना फुटला घाम

मुंबईत मागील काही दिवसांपासून गायब असलेला पाऊस आणखी किमान आठवडाभर सुट्टीवर असणार आहे. सध्या ‘मान्सून ट्रफ’ (कमी दाब प्रणाली) हिमालयाच्या दिशेने सरकले आहे. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागात पाऊस गायब आहे. ही स्थिती पुढील आठवडाभर ‘जैसे थे’ राहील. त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर वाढेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे राज्यातील शेतकरी मोठय़ा चिंतेत सापडले आहे, तर अचानक तापमानाचा पारा चढल्याने मुंबईकर घामाघूम होत आहेत.

जुलैमध्ये काही दिवसांतच विक्रमी पातळी गाठलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये नागरिकांची निराशा केली आहे. मुंबईत जुलैमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे उकाडय़ापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. तसेच धरण क्षेत्रातही चांगला पाऊस पडल्याने पाणीटंचाईचे टेन्शन दूर झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांत पावसाने राज्याच्या ग्रामीण भागासह मुंबईकडे पाठ फिरवली आहे. परिणामी, तापमानाची कमाल व किमान पातळी वाढली आहे. मागील तीन-चार दिवसांपासून मुंबईचे किमान तापमान 26 ते 27 अंशांच्या पुढे नोंद होत आहे. कमाल तापमानाचा पाराही चढणीला लागला आहे. ‘मान्सून ट्रफ’ उत्तर हिंदुस्थानच्या दिशेने सरकले आहे. त्यामुळे सध्या हिमालयाच्या पायथ्याशी जोरदार पाऊस होत आहे. परंतु मुंबई-महाराष्ट्राला पावसाची ओढ लागली आहे. पुढील किमान आठवडाभर हीच स्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. हवामान खात्याच्या या अंदाजाने शेतकऱयांची चिंता वाढवली आहे. पावसाने वेळीच पुनरागमन करून जोरदार हजेरी लावली नाही तर शेतपिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचवेळी मुंबईकरांना पाणीटंचाईच्या संकटाला तोंड द्यावे लागण्याची चिन्हे आहेत.

तब्बल 51 वर्षांनंतर  पावसाचा मोठा ब्रेक

पावसाने दीर्घ विश्रांती घेऊन शेतकऱयांना मोठय़ा चिंतेत लोटले आहे. राज्यात तब्बल 51 वर्षांनंतर पावसाने एवढा मोठा ब्रेक घेतला आहे. यापूर्वी 1972 मध्ये 18 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत पाऊस बेपत्ता झाला होता. त्यापुढील वर्षांत पाऊस सर्वसाधारण आठ ते दहा दिवसांपुरता दडी मारत आला आहे. यंदा मात्र पावसाने दडी मारण्याचाही विक्रम नोंदवला आहे.

शेतपिके करपण्याच्या मार्गावर 

पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राज्याच्या विविध भागांतील खरीप हंगामातील पिके धोक्यात सापडली आहेत. पावसाअभावी शेतपिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न पडल्यास शेतकऱयांना भीषण संकटाला तोंड द्यावे लागण्याची भीती आहे.