मुंबईकरांना गंडवले, आणखी पाच दिवस पाऊस पडणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । मुंबई

९ आणि १० जून रोजी अतिवृष्टी होणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने महापालिका, वीज वितरणच्या अधिकाऱयांच्या सुट्टय़ा रद्द झाल्या. पण ९ जून वगळता पावसाने पुढचे तीनही दिवस कोरडेच घालवले. त्याने मुंबईकरांना अक्षरश: गंडवले. आणखी पाच दिवस मुंबई कोरडीठाकच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कुठे गेला पाऊस ?
अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र बांगलादेशच्या दिशेला गेले आहे. त्यामुळे सध्या त्या ठिकाणी पाऊस पडत आहे. राज्यात मुंबई वगळता कोकण, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आज अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. महाराष्ट्रच नव्हे तर हिंदुस्थानातूनही पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल. त्यानंतर पुन्हा पाऊस सक्रिय होईल अशी माहिती हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक ए. के. श्रीवास्तव यांनी दिली.

– कोकण-गोव्यात अनेक भागांत तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.
– गोवा किनारपट्टीवर ताशी ५० ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन.
– मुंबईत पावसाची एखाद् दुसरी सर येण्याची शक्यता. आर्द्रता राहणार.