
सामना प्रतिनिधी । राहाता
कांदा टॉमॅटो पाठोपाठ वांग्याचेही बाजार भाव गडगडल्याने तसेच उत्पादन खर्चही निघत नसल्याने साकुरी येथील शेतकऱ्याने दोन एकर वांगी उपटून फेकली. २६ कँरेट वांग्याचे सुरत बाजार पेठेतून शिल्लक आले अवघे ६६ रूपये. वांग्याला केवळ २० पैसे किलो भाव मिळाल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने दोन एकरात लावलेली वांगी फेकून दिली.
बाराही महिने हमखास पैसे मिळवून देणार पिक म्हणून साकुरी येथील शेतकरी राजेंद्र बावके यांनी ऐन उन्हाळ्यात त्यांच्या शेतात दोन एकर वांग्याचे पिक घेतले. थोड्याशा पाण्यावर पिक जोमात आणले. त्यासाठी ड्रीप, खत, औषध असा सुमारे दोन लाखांचा खर्च केला मात्र वांगी निघायला लागल्यावर भाव पडले. तिन महिन्यांची मजूरी जाऊन अवघे ६० हजार रूपये राहीले. औषधाचे व ड्रीपचे व्यापारी देणे बाकी राहीले. मालही मोठ्या प्रमाणात निघू लागला पण त्याला भावच नाही राहीला. या जातीच्या वांग्याला सुरतला मोठ्या बाजारपेठेत चांगली मागणी असते. मात्र तेथे मागणीच नसल्याने पाठविलेली वांगी मातीमोल भावाने विकावी लागली.
वांग्याचा नंबर एक माल २६ कॅरेट विक्रीसाठी पाठविला. भाडे कमीशन हमाली जाऊन अवघे ६६ रूपये शिल्लक हातात आले. म्हणजे २० पैसे किलोने वांगी विकली गेली. स्थानीक बाजार पेठेतही मागणी नसल्याने तसेच औषध फवारणी तोडणी मजूरी घरातून भरायची वेळ आल्याने अखेर दोन एकर वांगी उपटून टाकण्याचा निर्णय बावके यांनी घेतला. पण तेही उपटण्यासाठी १२ हजार रूपये मजूरी लागल्याचे त्यांनी सांगीतले.

































































