कोस्टल रोडच्या कामात सागरी जिवांनाही जपले, समुद्र विज्ञान संस्थेकडूनही समाधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> देवेंद्र भगत

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱया कोस्टल रोडच्या कामात आठ टनांपर्यंतच्या भल्यामोठय़ा दगडांची पर्यावरणपूरक भिंत प्रवाळ आणि सागरी जिवांनाही जपत असल्याचे समोर आले आहे. याबाबत प्रत्येक महिन्याला थर्ड पार्टीकडून सर्वेक्षण होत असून पर्यावरण मंत्रालयाला अहवाल पाठवला जात आहे. या अहवालात सागरी जिवांचे संरक्षण आणि वाढ झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे भारतीय समुद्र विज्ञान संस्थेकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱया महत्त्वाकांक्षी सागरी मार्गाच्या बांधकामात पर्यावरणाला कोणतीही बाधा होणार नाही याची काळजी घेतली जात आहेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱया महत्त्वाकांक्षी सागरी मार्गाच्या बांधकामात पर्यावरणाला कोणतीही बाधा होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. पर्यावरण खात्याने दिलेल्या निर्देशानुसार कोस्टल रोडच्या बांधकामात सागरी जिवांच्या रक्षण आणि वाढीसाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचेही अश्विनी भिडे यांनी सांगितले. प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक या 10.58 किमीच्या मार्गात सी वॉल 7.5 किमी लांबीची समुद्री भिंत बांधण्यात येत आहे. या भिंतीचे 68 टक्के काम सध्या पूर्ण झाले आहे. या भिंतीसाठी वापरण्यात येणाऱया दगडांच्या पोकळ्यांमध्ये सागरी जिवांची वाढ, प्रजननासाठी जागा उपलब्ध होत आहे. कोस्टल रोडच्या पर्यावरणपूरक बांधकामामुळे 70 टक्के वेळ वाचणार असून 34 टक्के इंधनाची बचत होणार असल्याने प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

वरळी, हाजीअलीजवळ प्रवाळांचे जतन-संवर्धन

कोस्टल रोडच्या कामात दोन ठिकाणी प्रवाळांच्या वसाहती होत्या. यातील एकाचे स्थलांतर वरळी, तर एकाचे स्थलांतर हाजीअली नेव्हीनगर या ठिकाणी सुरक्षितरीत्या करण्यात आले असून संवर्धन करण्यात येत आहे. त्यांची वाढही उत्तम असल्याचे भारतीय समुद्री विज्ञान संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. समुद्री विज्ञान संस्थेच्याच सल्ल्यानुसार हे काम केले जात आहे.

कोस्टल रोडचे 40 टक्के काम फत्ते

z सद्यस्थितीत कोस्टल रोडचे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. कोरोनामुळे कामाला काहीसा फटका बसल्याने जुलै 2023च्या कामाच्या डेडलाइनला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे.
z यातील एका पॅकेजचे काम जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. सद्यस्थितीत एकूण भरावापैकी 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. पायलिंग, फाऊंडेशनचे कामही सध्या वेगाने सुरू आहे.
z 2 किमी लांबीच्या दोन महाकाय बोगद्यांचे 15 टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये दररोज रोज 10 ते 12 मीटर काम केले जात आहे. उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे भिडे यांनी सांगितले.
वेळ-इंधन वाचवून वेगवान प्रवास करणाऱया कोस्टल रोडच्या बांधकामात सागरी जिवांच्या संरक्षण, जतन आणि संवर्धनाची काळजी घेतली जात आहे. त्याला मिळालेल्या यशाबद्दल भारतीय
समुद्री विज्ञान संस्थेकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
z अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त