
सामना प्रतिनिधी । अलिबाग
सर्वसामान्य कुटूंबाना खाजगी रुग्णालायतील प्रसूती खर्च परवडणारा असतो. त्यामुळे सर्वसामान्य तसेच निम्न मध्यम वर्गातील कुटुंब जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्राचा आसरा घेतात. मात्र याठिकाणीही सर्व सामान्य रुग्णांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयावरच अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र तयार झाले आहे. रायगड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात काही ठिकाणी सोनोग्राफी सुविधा नाही तर जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी सुविधा असूनही आठ महिन्यापासून तज्ज्ञ डॉक्टर अभावी बंद पडलेली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन सोनोग्राफी करावी लागत असून त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
गरोदरपणात प्रत्येक महिलेची किमान तीन वेळा सोनोग्राफी होणे गरजेचे असते. प्रसुती दरम्यान माता मृत्युचे प्रमाण कमी करणे, बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, राष्ट्रीय पोषण मिशन सारख्या योजना सुरू केल्या आहेत. मात्र, या योजनेत सोनोग्राफी करण्यासाठी कुठलीही तरतुद नाही. प्रत्येक वेळेला दीड ते दोन हजार रुपये येणारा खर्च गरीब कुटुंबातील रुग्णांना परवडत नसल्यामुळे सोनोग्राफी न करता होणारे बाळंतपणात माता, बालमृत्यू, अपंग बाल जन्माला येणे अशा घटना घडल्या आहेत. यामुळे रायगड जिल्ह्यात कुपोषण निर्मुलनाच्या मुळ उद्देशालाच धोका पोहचत आहे. प्रसुती दरम्यान सोनोग्राफी तपासणी होणे गरजेचे असते.
मात्र शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी सुविधाच गर्भगळीत झाली असल्याने सर्वसामान्य व गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करून खाजगी रुगणलायत सोनोग्राफी करावी लागत आहे. या संधीचा फायदा घेत रायगड जिल्ह्यात खासगी सोनोग्राफी सेंटर एका पाठोपाठ एक सुरू झाले असताना सरकारी रुग्णालयात एकही सोनोग्राफी मशीन सुरू नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयाचा व्यवसाय वाढीसाठी शासकीय रुग्णालय प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
खाजगी फी परवडत नसल्यामुळे सोनोग्राफी तपासणी न करता होणारी प्रसुती धोक्याची असते. यातून माता, बालमूत्यु, व्यंगबाळ जन्माला येणे अशा घटना घडल्या आहेत. निदान आदिवासी, दलित, आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील महिलांसाठी विशेष योजना बनवून सरकारने ही जादा फी भरावी, अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. – अशोक जंगले, समन्वयक पोषण सेवावर देखरेख प्रकल्प
सोनोग्राफी मशीन हाताळण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची गरज असते. नवी भरती न करता सरकार कंत्राटीपद्धतीने या पदावर नियुक्त्या करीत असते. अपुरा पगार आणि जास्त काम यामुळे अनेकजण सोडून जातात, ही वस्तुस्थिती असल्याने कर्जत येथील सोनोग्राफी मशीन बंद आहे. जिल्हा रुग्णालयातही अशीच परिस्थिती असली तरी दोन ते तीन दिवसात येथील रिक्तपदावर नियुक्ती होणार आहे. – डॉ. अजित गवळी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय-अलिबाग
जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन तत्काळ सुरू होईल, असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी अनेकवेळा आश्वासन दिलेली आहेत. मात्र, तज्ञ डॉक्टर टेक्नीशियन नसल्याने ही मशीन मागील आठ महिने बंद आहे. यातून गरीब कुटुंबातील रुग्णांची मोठी लूट होत आहे. यास सर्वस्वी अधिकारी वर्ग जबाबदार आहे. – अजित पाटील, जिल्हा रुग्ण कल्याण समिती, अलिबाग






























































