
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पुढे ढकलण्यासाठी निष्कारण राजकीय लुडबुड केली गेल्याचे उघड झाले आहे. भाजप आमदार आशीष शेलार यांनी दुबार मतदार नोंदणीच्या संशयावरून निवडणूक पुढे ढकलण्यापासून ते अगदी ईडी चौकशीपर्यंत अट्टाहास धरला. मात्र विद्यापीठाच्या त्रिसदस्यीय समितीने मतदार यादीत दुबार मतदार नोंदणी झालीच नाही. दोनदा आढळलेली समान नावे वेगवेगळय़ा मतदारांची आहेत, असा निष्कर्ष काढला आहे.
मुंबई विद्यापीठाकडून पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पात्र आणि मतदार होऊ इच्छिणाऱयांकडून नव्याने अर्ज मागवण्यात आले असून मतदार नोंदणीनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसंदर्भात मुंबई विद्यापीठाने प्रा.आर. एस. माळी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. त्यात अॅड. प्रवीण सय्यद आणि डॉ. प्रकाश पुंभार सदस्य होते. या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल अखेर सादर झाला आहे. अहवालात मतदार यादीमधील 756 मतदारांची नावे दोन किंवा अधिक वेळा दिसत असली तरी त्यातील प्रत्येक मतदार हा वेगळा असल्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे भाजप आमदार आशीष शेलार यांच्या तक्रारीत काहीच तथ्य नसल्याचे या अहवालातून आता उघड झाले आहे.
नव्याने अर्ज मागविण्यात येणार
सिनेट निवडणुकीची मतदार यादी नव्याने तयार करण्याचे काम सुरू करून लवकरच सुधारित निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. प्रा. आर. एस.माळी समितीने 2017 च्या एकसमान कायदे क्रमांक 2 च्या तरतुदीनुसार पदवीधरांची मतदार म्हणून नव्याने नावनोंदणी करण्याची शिफारस केली आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने विद्यापीठाला निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्याच्या दिलेल्या निर्देशनुसर बुधवार, 25 ऑक्टोबरला पार पडलेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱया पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पात्र आणि मतदार होऊ इच्छिणाऱयांकडून नव्याने अर्ज मागवण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातील अधिसूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
मतदार यादीसंदर्भात समितीने नोंदवलेली निरीक्षणे
– मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणुकीसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या मतदारांची अंतिम संख्या 90,224 एवढी झाली आहे
– या अंतिम मतदारांच्या यादीत 756 मतदारांची नावे दोन पिंवा अधिक वेळा दिसून येत असली तरी ते वेगवेगळे मतदार आहेत. हे त्यांच्या पदवी प्रमाणपत्रावरील नाव, पदवीचा विषय, विद्याशाखा, निवासाचा पत्ता व पदवी प्राप्त होण्याचे वर्ष, अर्जावर नमूद केलेली माहिती यावरून खात्री केली आहे.
– मतदार यादीमध्ये कोणत्या मतदाराने मतदान केले आहे हे कळून यावे यासाठी मतदार यादीत सारखी नावे असलेल्या नावापुढे जो फरक आहे ते नमूद केले जाईल.
– उदाहरणार्थ मतदाराचा पह्टो वास्तव्याचे ठिकाण यातून हा फरक नमूद होईल, असे समितीकडून अहवालात म्हटले आहे.
– विद्यापीठाने पूर्वी 94,162 मतदाराची अंतिम मतदार यादी जाहीर केली होती व आता त्यातील काही अर्ज बाद झाले व बाद झालेले काही अर्ज स्वीकारले गेले आहेत
– त्यामुळे सध्या अंतिम 90,224 मतदारांची यादी तयार झाली आहे.
– त्यामुळे या सिनेट निवडणुकीची मतदार यादी नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू करणे उचित ठरेल, असे समितीचे मत नोंदविले आहे.
…तर याची चौकशी झाली पाहिजे
सिनेट निवडणूक पुढे ढकलण्यासाठी उठाठेव करणारे भाजप आमदार आशीष शेलार यांनी विद्यापीठाशी संबंधित अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील माहिती कशी मिळवली, याची चौकशी झाली पाहिजे. विद्यापीठ समितीच्या अहवालामुळे शेलार यांना जबरदस्त चपराक बसली आहे, अशी प्रतिक्रिया उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे अॅड. सागर देवरे यांनी दिली.
आज दाखल होणार अवमान याचिका
न्यायालयाने आदेश देऊनही मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे उद्या, गुरुवारी अॅड. सागर देवरे मुंबई उच्च न्यायालयात विद्यापीठाविरुद्ध अवमान याचिका दाखल करणार आहेत. या अवमान याचिकेवर तातडीने सुनावणी होण्याची शक्यता असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

























































