सात तलावांत ऑगस्टपर्यंत पुरणारा जलसाठा, या वर्षी पाणीकपात टळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱया सात तलावांत आज 646032 दशलक्ष लिटर्स इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा 48 टक्के असून पुढील 170 दिवसांना पुरणारा म्हणजेच ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरणारा आहे. त्यामुळे मुंबईत गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात होणारी 10 ते 15 टक्क्यांची पाणीकपात या वर्षी मात्र टळणार असल्याचे संकेत पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3800 दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून उशिरा सुरू होणारा पाऊस आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे मे-जून महिन्यात मुंबईत 10 ते 15 टक्के पाणीकपात करावी लागते. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय टाण्यासाठी पालिका आणि मुंबईची वाढती तहान भागवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून समुद्राचे पाणी गोडे करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मनोरी येथे उभारत आहे. या प्रकल्पात सुरुवातील 200 दशलक्ष लिटर तर प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर दररोज 400 दशलक्ष लिटरपर्यंत पाणी मिळणार आहे.

तलावांतील उपलब्ध पाणीसाठा
अप्पर वैतरणा 96290 दशलक्ष लिटर
मोडकसागर 63780 दशलक्ष लिटर
तानसा 52557 दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा 84156 दशलक्ष लिटर
भातसा 333515 दशलक्ष लिटर
विहार 11452 दशलक्ष लिटर
तुळशी 4282 दशलक्ष लिटर
तीन वर्षांतील 18 मार्चचा जलसाठा
2022 646032 दशलक्ष लिटर 44.64 टक्के
2021 599505 दशलक्ष लिटर 41.42 टक्के
2019 639780 दशलक्ष लिटर 44.20 टक्के