गुटखा थुंकण्यासाठी खिडकीतून वाकला आणि जीवानिशी गेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नोएडा

यमुना एक्सप्रेस वेवर भरधाव वेगात गाडी पळवताना गुटखा थुंकणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. थुंकण्यासाठी त्याने खिडकीबाहेर डोके काढताच रस्त्यावरील एका खांबावर ते आदळले. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रशांत कसाना असे त्याचे नाव असून तो घरांच्या खरेदी विक्रीची कामे करत होता.

गुरुवारी रात्री यमुना एक्सप्रेस वेवर तो जॅग्वार कारमधून नोएडातील घराकडे निघाला होता. गुटखा खात तो मजेत ड्रायव्हिंग करत होता. रात्रीची वेळ असल्याने एक्सप्रेस वे बऱ्यापैकी रिकामा होता. यामुळे प्रशांतने गाडीचा वेग १२९ किमी एवढा वाढवला. पण मध्ये मध्ये तो रस्त्यावर थुंकतही होता. त्याचवेळी ड्रायव्हिंग करताना त्याने अचानक खिडकीची काच खाली केली व थुंकण्यासाठी म्हणून त्याने डोके बाहेर काढले. पण डोके नेमके रस्त्यावरील एका खांबाला आदळले आणि कार पलटी झाली. हे बघताच एक्सप्रेस वेवर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिथे धाव घेतली. त्यानंतर प्रशांतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला दिल्लीतील अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले. पण तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.