
सामना प्रतिनिधी। ग्रेटर नोएडा
आमच्या जवानांचे रक्त गेली कित्येक वर्षे तापलेले होते. पण पूर्वीच्या काँग्रेसच्या सरकारने धोरण बदलण्याऐवजी फक्त गृहमंत्री बदलले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे काँग्रेसवर हल्ला चढवला. ते ग्रेटर नोएडा येथे दीनदयाल उपाध्याय पुरातत्व संस्थेचे उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. आम्ही तर ‘एअर स्ट्राइक’ चढवून शांत बसलो होतो. सर्जिकल स्ट्राइक या आधी केला तेव्हा आम्हीच देशाला ते सांगून टाकले होते, पण यावेळी पाकिस्तानच पहाटे पाच वाजता ‘मोदीने मारा, मोदीने मारा’ असे ओरडतच उठला, असे मोदी म्हणाले.
हिंदुस्थानशी छुपे युद्ध करतच राहू असेच पाकिस्तान मानून चालला होता. पूर्वीच्या सरकारने त्याला प्रत्युत्तरच न दिल्यामुळे त्याची हिंमत वाढली होती. ‘26/11’च्या हल्ल्यावेळीही प्रतिहल्ला करता आला असता, पण त्यासाठी धाडस असावे लागते असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.pm md
























































