
खासगी अनुदानित माध्यमिक शाळांतील 555 अतिरिक्त शिक्षकांचे मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये समायोजन प्रक्रिया सुरु झाली असून बुधवारी दिवसभरात 100 हून अधिक शिक्षकांना महापालिकेच्या विविध शाळांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे.
अतिरिक्त शिक्षकांची पालिका शाळांमधील रिक्त पदांवर समायोजन करण्यासाठी पालिका अतिरिक्त आयुक्तांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार 555 शिक्षकांचे पालिका प्राथमिक शाळांमध्ये माध्यमनिहाय रिक्त पदांवर त्या शिक्षकांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार तात्पुरते समायोजन केले जाणार आहे. मराठीसह हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, कन्नड या माध्यमाच्या पहिली त पाचवी 145, सहावी ते आठवी 243 आणि नववी ते दहावीचे एकूण 167 शिक्षक अतिरिक्त आहेत.
बुधवारी दिवसभरात 100 हून अधिक शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. मात्र या शिक्षकांचे समायोजन करू नये अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. या अतिरिक्त 555 शिक्षकांपैकी काही शिक्षक रात्रशाळेत नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे. ऐन बोर्ड परीक्षांच्या काळात या शिक्षकांना प्राथमिक शाळेत पाठवून विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये अशी मागणी शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी केली. या समायोजनाच्या विरोधात चर्नी रोड कार्यालयाबाहेर आंदोलनही करण्यात आले.























































