
विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 20 डिसेंबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी, डिसेंबर 2018 व 16 फेब्रुवारी 2019 चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा, पाच दिवसांचा आठवडा करावा आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. संपाआधी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 14 ते 19 डिसेंबरदरम्यान सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत.
अशासकीय महाविद्यालीन शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. महाविद्यालयीन रिक्त शिक्षकेतर पदे तत्काळ भरण्यात यावीत, 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्ती झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असून संघाचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंग, सरचिटणीस माधव राऊळ, उपाध्यक्ष सुदर्शन आग्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.































































