अवकाळी मुसळधार पावसाने देवरुख परिसराला चांगलेच झोडपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । देवरुख

आज दिवसभर आग ओकणाऱ्या सुर्याने पाऊस पडण्याची शक्यता खरी ठरली. संध्याकाळी ६:३० ते ७ च्या दरम्यान अवकाळी मुसळधार पावसाने शहर परिसराला चांगलेच झोडपून काढले. या महिन्यात अवकाळी कोसळण्याची ही दुसरी घटना आहे.

काल दिवसभर उष्मा वाढला होता. काल संध्याकाळी वातावरण ढगाळ होते. आजही सकाळी काही वेळ मळभ होते. दुपारनंतर उष्णता अधिकच वाढल्याने अवकाळी कोसळण्याची शक्यता खरी ठरली. आज संध्याकाळी ६ नंतर ढग भरून आले. ६:२० च्या दरम्यान पावसाने शिंतोडा केला मात्र त्यानंतर सलग २० मिनिटे देवरुख आणि परीसरात मुसळधार पाऊस कोसळला.

गेल्याच आठवड्यात तालुक्यात मुसळधार पावसासह गारा पडल्या होत्या. त्यावेळी वादळी वारे आणि विजांचा कडकडाट झाला होता. तालुक्यात एका ठिकाणी वीज कोसळून नुकसान झाले होते. आज मात्र नुसता पाऊसच कोसळला.

या महिन्यात सलग दोन वेळा अवकाळी आल्याने आता हापूसवर संक्रांत निश्चित मानली जात आहे. मागच्या पावसामुळे फळगळ सुरु झाली मात्र त्यानंतर वातावरण बदलल्याने फळ झाडावरच राहिले. आजच्या पावसाने मात्र उरला सुरला हापूस नुकसानीत जाणार असल्याचे स्पष्ट झाले.