
सामना ऑनलाईन । नागपूर
आश्रमशाळेतील मुलींवर अत्याचार झाल्याप्रकरणी असंवेदनशील वक्तव्याप्रकरणी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांना महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. त्याचसोबत सुभाष धोटे, आमदार सुरेश धानोरकर यांनाही महिला आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. राजुऱ्यात आदिवासी वसतिगृहातील लैंगिक शोषण घटनेप्रकरणावरून पोक्सोबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
काय म्हणाले होते वडेट्टीवार
‘पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला तर सरकारकडून पैसे मिळतात आणि त्यामुळे आदिवासी मुली अत्याचार झाल्याची तक्रार देण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पुढे येत आहेत’ असे अत्यंत संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी केले होते. या संतापजनक वक्तव्याचा आदिवासी समाजातर्फे तीव्र निषेध करण्यात आला.
महिलांनी केला निषेध
हा आदिवासी समाजाचा अपमान असल्याची भावना संतप्त प्रदर्शन करणाऱ्या लोकांनी व्यक्त केली होती. या वेळी संतप्त महिलांनी या काँग्रेस नेत्यांविरोधात नारेबाजी करत त्यांच्या फोटोला चपला मारून आणि थुंकून आपला राग व्यक्त केला. श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी काँग्रेस नेत्यांचे हे वक्तव्य म्हणजे बलात्कारपीडित मुलींमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.




























































