आता जनताच भाजपचा हिशोब चुकता करणार; विनायक राऊत यांचा इशारा

मिंधे सरकारचे मंत्री दिपक केसरकर यांनी महागडी व्हॅनिटी व्हॅन घेतली आहे. आपली जमीन विकून निवडणूकीला खर्च करतो, अशा बाता दरवेळी केसरकर करतात. आता ही व्हॅनिटी व्हॅन दीपक केसरकर यांनी जमीन विकुन घेतली की मिळालेल्या खोक्यातून घेतली हे जाहीर करावे, असा टोला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे इंडिया – महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी लगावला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- इंडिया- महाविकास आघाडीचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी मालवण तालुक्यात जि. प. विभाग निहाय जाहीर प्रचार सभा पार पडल्या.आचरा तिठा, पोईप तिठा,कट्टा बाजारपेठ, तारकर्ली काळेथर या चार ठिकाणी झंझावाती सभा पार पडल्या. या सर्व सभांना कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विनायक राऊत यांच्या विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सज्ज झाले असून विनायक राऊत यांच्या विजयाचा निर्धार यावेळी करण्यात आला. तर विनायक राऊत तुम आज बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.

विनायक राऊत पुढे म्हणाले, गॅस, पेट्रोल, डिझेल, तेल, लाईटबील या सर्व गोष्टीमध्ये भरमसाठ महागाई वाढविणाऱ्या, सरकारी उद्योग धंदे, सरकारी कंपन्यांची विक्री करणाऱ्या आणि महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरात मध्ये नेऊन महाराष्ट्रात बेरोजगारी वाढविणाऱ्या मोदींच्या नावाने भाजप पक्ष मते मागत आहेत. जनतेला 2 रुपये देऊन 100 रुपये उकळणाऱ्या मोदी सरकारचा कारभार जनतेला कळून चुकला आहे. आता जनता याचा हिशोब लोकसभा निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

…याचसाठी कार्डियाक कॅथलॅब झाली रद्द- वैभव नाईक
आमदार वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयासाठी मंजूर करण्यात आलेली कार्डियाक कॅथलॅब सोलापूर येथे स्थलांतरित करण्यात आली आहे. राणेंच्या खाजगी रुग्णालयाच्या फायद्यासाठी सिंधुदुर्गच्या जनतेला जिल्हा रुग्णालयात मोफत मिळणारी सेवा आता जिल्ह्याबाहेर गेली. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या राज्य सरकारच्या तिनही मंत्र्यांचे हे अपयश आहे. राणेंना जनतेचे काहीही पडलेले नाही. राणे स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात याचे हे आणखी एक उदाहरण आहे. विनायक राऊत हे सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहेत. कधी त्यांची जनतेला गरज भासते तेव्हा ते सहज जनतेला उपलब्ध असतात. मात्र आता त्यांच्या विरोधात असलेले राणे किती वेळा जनतेला दिसले. उमेदवारी मिळाल्याने आता ते घराच्या बाहेर पडले आहेत. 10 वर्षे त्यांना जनतेचे काहीही पडलेले नव्हते. गेली 4 वर्षे केंद्रीय उद्योग मंत्री असून देखील राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकही उद्योग आणला नाही. याउलट विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज आणले. जिल्ह्यात महामार्गाचे काम पूर्ण करून घेतले. चिपी विमानतळ सुरु करून घेतले. जिल्ह्यात डबगाईस गेलेल्या बीएसएनएल टॉवरचे जाळे निर्माण केले. तौकते वादळ ग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून दिली. त्यामुळे जनतेचा शिवसेनेवर आणि विनायक राऊत यांच्यावर विश्वास आहे, असे वैभव नाईक यांनी सांगितले.