
सामना प्रतिनिधी । मुंबई
यूटीएस अॅपवरून लोकलचे तिकीट कोणत्याही रांगा न लावता रेल्वे प्रवाशांना आपल्या स्मार्ट मोबाईलवरून काढण्याचा फंडा आता अधिक सोपा झाला आहे. या यूटीएस अॅपसाठी दोन अतिरिक्त सर्व्हरचा बंदोबस्त करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांचे मोबाईल हँग होण्याचे प्रमाण कमी होणार आहे.
तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मोबाईलवरून लोकल तिकीट सेवेचे उद्घाटन करण्यात आले होते. याआधी या पेपरलेस तिकिटासाठी जीपीएस नेटवर्कची समस्या येत होती. त्यामुळे प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागायचे. आता ही सेवा लोकप्रिय होत असतानाच सर्व्हरच्या क्षमतेची नवीनच समस्या पुढे आल्याने प्रवाशांचे मोबाईल हँग होऊ लागले. त्यामुळे ‘क्रिस’ने आता दोन इतर अॅपसाठी वापरले जाणारे सर्व्हर यूटीएस अॅपसाठी वापरल्याने रेल्वे प्रवाशांचे मोबाईल हँग होणार नाहीत. सध्या दिवसाला पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांकडून १० ते १२ हजार यूटीएस पेपरलेस तिकिटांची विक्री होत आहे. हे प्रमाण २०० टक्के वाढविण्याचे उद्दिष्ट राखण्यात आले असून त्यासाठी पथनाट्याद्वारे मोबाईलवरून तिकीट विक्रीचा प्रसार केला जात आहे. त्यामुळे पुन्हा हे अॅप वापरणाऱ्यांची संख्या अचानक वाढल्याने सर्व्हरवर लोड आल्याने नवे दोन सर्व्हर या सेवेसाठी वापरण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.


























































