
नृत्यकलेचा ध्यास आणि त्यातून उभी राहिलेली संस्था म्हणजे डोंबिवली येथील नृत्यश्री कथ्थक नृत्यालय. मनाली केळकर या नृत्यालयाच्या संस्थापिका आहेत. दहा वर्षांपूवी मनाली यांनी नृत्यश्रीचे रोपटं लावलं होतं. आज हे रोपटं वाढलं आहे, बहरलं आहे.
मनाली केळकर यांनी आपल्या गुरू संगीताचार्य वैशाली दुधे यांच्याकडे नृत्य-अलंकारचे शिक्षण घेत असताना वयाच्या 21 व्या वर्षी नोकरी करतानाच घरात ‘नृत्यश्री कथ्थक नृत्यालय’ या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर साधारण दीड वर्षाने कुटुंबाच्या पाठिंब्याने नोकरी सोडून पूर्ण वेळ संस्थेला दिला आणि मोठय़ा जागेत संस्था सुरू केली.
‘नृत्यश्री’मध्ये आज शंभराहून अधिक विद्यार्थिनी कथ्थक नृत्य शिकत आहेत. या विद्यार्थिनींनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे आणि बक्षिसंही मिळवली आहेत. वेगवेगळय़ा मंचावर संस्थेच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर करण्याची संधी मिळाली आहे.
नृत्यालयाचे वार्षिक संमेलन एका वर्षाआड अयोजित केले जाते. यामध्ये थक्क करणारे कलाविष्कार पाहावयास मिळतात. ‘नृत्यश्री’चे वार्षिक संमेलन 11 डिसेंबरला पार पडले. यावेळी नृत्यालंकार प्रीती वाळुस्कर, विद्यानिकेतन शाळेचे संचालक विवेक पंडित आदी उपस्थित होते. ‘हरी-रूप दशावतार’ या नृत्य नाटिकेने सर्वांना जिंकून घेतले. नृत्य नाटिकेत भगवान श्री विष्णूंच्या दहा अवतारांची कहाणी नृत्य आणि अभिनयाद्वारे सादर करण्यात आली. नाटिकेने इतका रंग चढला की, कार्यक्रमाच्या शेवटी प्रेक्षकांना आनंदाश्रू आवरले नाहीत. हरी रूपाच्या गजरात सारे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. ही नृत्य नाटिका व्यावसायिक रूपात मंचावर आणण्याची मागणी प्रेक्षकांनी केली. वार्षिक स्नेहसंमेलनात ‘अनप्लग -ऍन एंडेव्हर’ हा कलाविष्कारदेखील आकर्षण ठरला. यामध्ये विद्यार्थिनी कुठल्याही वाद्यांचा वापर न करता टाळय़ांच्या ठेक्यावर पारंपरिक कथ्थक नृत्य सादर करत वेगवेगळय़ा तालांची छटा एकाच वस्तुक्रमात दाखवत गेले. मनाली आणि त्यांच्या विद्यार्थिनी साक्षी कुलकर्णी, सानिका काळे, अनवी जोग, अन्विता कुलकर्णी, जुई पंडित आदींनी आपल्या मुखाने साथ करत टाळय़ांच्या आधारे वेगवेगळय़ा प्रकारचे ठेके लावत सादर केले. यानिमित्ताने अतिशय सुंदर अशी अनुभूती रसिकांना मिळाली.






























































