
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
हिंदुस्थानचे राजकीय मुत्सद्दी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतरच पीडीपी सरकार पाडण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तत्पूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी जम्मू-कश्मीरच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्यातील नेत्यांची बैठक बोलवली होती. जम्मू-कश्मीर सरकारमध्ये सामील झालेले सर्व मंत्री व महत्वांच्या नेत्यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आले होते. यावेळी जम्मू-कश्मीरमधील विविध प्रश्नांवर शहा यांनी मंत्री व नेत्यांशी चर्चा केली. त्याआधी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली होती.
केंद्र सरकारने रमजानच्या पवित्र महिन्यात जम्मू-कश्मीरमध्ये एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर केली होती. पण तरीही जम्मू-कश्मीरमध्ये ६६ दहशतवादी हल्ले झाले. यात २२ जवान शहीद झाले तर १९ नागरिकांचा मृत्यू झाला. जाँबाज जवान औरंगजेब याची दहशतवाद्यांनी केलेली हत्या, रायझिंग कश्मीरचे संपादक शुजात बुखारींची दहशतवाद्यांनी केलेली हत्या यामुळे मोदी सरकारवर देशभरातून मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. यामुळे भाजपची पुरती कोंडी झाली आहे. यापार्श्वभूमीवर शहा यांनी ही बैठक बोलावली होती.
मंगळवारी सकाळी डोवाल यांनी शहा यांची भेट घेतली. यावेळी डोवाल यांनी शहा यांना जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचा इशारा दिला. तसेच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करता येईल या योजनेची माहितीही त्यांनी शहा यांना दिली. यावेळी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी रोडमॅपही तयार करण्यात आल्याचे त्यांनी शहा यांना सांगितले.


























































