
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या 236 करण्यासंदर्भातील मुंबई महापालिका सुधारणा विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी निर्णय घेतल्यानंतर आज या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. राज्यपालांच्या मंजुरीनंतर हे विधेयक अंमलात येणार असून यानुसार प्रभागरचना होऊन 236 प्रभागांत आगामी महापालिका निवडणुका होतील.
मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या 227 इतकी आहे, मात्र ही सदस्य संख्या 2001 च्या जनगणनेनुसार निश्चित करण्यात आलेली आहे. 2011 च्या जनगणनेनंतर निर्वाचित सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आलेला नाही व ही सदस्य संख्या कायम राहिली. मात्र 2011 च्या जनगणनेची आकडेवारी विचारात घेतली तर 2001 ते 2011 दरम्यान मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्येमध्ये 3.87 टक्के इतकी वाढ झालेली आहे. लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ, वाढते नागरीकरण या बाबी विचारात घेऊन वाढीव प्रतिनिधित्व निश्चित करणे गरजेचे होते, त्यानुसार निर्वाचित सदस्यांची संख्या वाढविण्याचे ठरविण्यात आले असून ही सदस्य संख्या 236 करण्यात आली असून याविषयीचे विधेयक आज संमत केले आले.
भाजपचा विरोध
भाजपने या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले आहे, मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. 2021 ची जनगणना झालेली नसताना वाढलेल्या लोकसंख्येच्या आधारावर प्रभाग वाढविण्याचा निर्णय सरकार कसे घेऊ शकते, असे सांगत भाजपच्या वतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार अमित साटम यांनी विरोध केला. मात्र गेल्या दोन वर्षाच्या काळात कोविडची साथ असल्याने जनगणना पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे सरकारकडे 2021 च्या जनगणनेची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.


























































