टँकरची संख्या वाढता वाढता वाढे….सरकारची मदार खासगी टँकर लॉबीवरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सर्वदूर पाऊस पसरला असला तरी अजूनही राज्यातील विहिरी, तलाव आणि धरणांमधील पाण्याच्या पातळीत झपाटय़ाने वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे वाडय़ा-वस्त्यांना या मोसमातही टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. सध्याच्या घडीला 484 टँकर गावकऱयांची तहान भागवत आहेत.

राज्यातल्या 616 गावे व 1 हजार 715 वाडय़ांमधील लोकांची तहान टँकरच्या पाण्याने भागवण्यात येत आहे. मागील आठवडय़ात या वाडय़ा-वस्त्यांची तहान भागवण्यासाठी 454 टँकर धावत होते. त्यानंतर पावसाचे आगमन झाले, पण तरीही टँकरची संख्या वाढली असे सध्या चित्र आहे.

खासगी टँकरची चलती

या गावकऱयांना पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारच्या वतीने सरकारी टँकरची सोय केली जाते, पण सरकारी टँकरची संख्या कमी आहे. सध्या फक्त 41 टँकरने पाणीपुरवठा होत आहे. मात्र दुसरीकडे खासगी टँकरची संख्या वाढत आहे. सध्या तब्बल 443 खासगी टँकर धावत आहेत.

ठाणे-रायगड आघाडीवर

संपूर्ण राज्यात ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर व नाशिकमधील टँकरची संख्या अधिक आहे. ठाण्यात 48, रायगडमध्ये 47, रत्नागिरीत 16, पालघरमध्ये 39, नाशिकमध्ये 45, पुणे-साताऱयात 44 टँकर धावत आहेत. राज्याच्या इतर भागात टँकरची संख्या तुलनेत कमी आहे.

कोकणातील धरणांची स्थिती

कोकण विभागातील लहान-मोठय़ा अशा सर्व धरणांतील पाण्याची पातळी 31.98 टक्के आहे. तर नाशिकमधल्या धरणांतील पाण्याची पातळी 22.76 टक्के तर पुणे विभागातील धरणांतील पाणी पातळी फक्त 11.34 टक्क्यांवर आली आहे.

टँकरची संख्या वाढण्याची भीती

राज्यात गेल्या काही काळापासून टँकरची संख्या झपाटय़ाने वाढतच आहे. वास्तविक पावसाचे आगमन झाल्यावर टँकरची संख्या कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. आता जुलैच्या पंधरवडय़ात पावसाचा वेग मंदावण्याची भीती हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे तलाव, धरणे आणि विहिरींमधील पिण्याच्या पाण्याची पातळी खालावल्यामुळे टँकरची संख्या वाढण्याची भीती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने वर्तवण्यात येत आहे.