पुण्यात नायलॉन मांजा विक्री करणारा अटकेत, युनीट एकची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोळ्या -बिस्कीट विक्रीच्या नावाखाली दुकानामध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणार्‍या एकाला गुन्हे शाखेच्या युनीट एकने अटक केली आहे. त्याच्याकडून एक हजार रूपये किंमतीचा मांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरूध्द खडक पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल आरीफ शेख (रा. इनामकेमळा, लोहीयानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

युनीट एकचे पथक हद्दीत पेट्रोलींगसाठी फिरत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना लोहियानगरमध्ये मांजाविक्रेत्याची माहिती मिळाली. घरात गोळ्या-बिस्कीटांची विक्री करण्याआड तो पंतग उडविण्याच्या नायलॉन मांजाची अनधिकृतपणे विक्री करत होता. याची माहिती मिळताच पथकाने त्याला ताब्यात घेत एक हजार रूपयांचा मांजा जप्त केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक अजय जाधव, रमेश तापकीर, अमोल पवार, शशिकांत दरेकर यांनी केली.

घरामध्ये लहान मुलांच्या गोळ्या बिस्कीट विक्रीच्या नावाखाली पतंग उडविण्याचा प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून त्याला ताब्यात घेत एक हजारांचा मांजा जप्त केला.
संदीप भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनीट एक