‘एकच पर्व ओबीसी सर्व’ घोषणेने देऊळगावराजा शहर दणाणले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । देऊळगावराजा (जि. बुलढाणा)

देऊळगावराजा शहरामध्ये ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. ‘एकच पर्व ओबीसी सर्व’ आणि ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मराठा समाजाने आता मोर्चाची नाही तर त्यांनी जल्लोषाची तयारी करावी, असे विधान केल्याने महाराष्ट्रभर असलेला ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. देऊळगावराजा शहरांमध्ये ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्च्यामध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावू नये अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली.

या मोर्चाची सुरुवात संत शिरोमणी सावता महाराज मंदिर माळीपुरा येथून करण्यात आली. येथून बालाजी फरक कमिटी चौक, त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून बस स्टॅन्ड चौकातून तहसीलमध्ये सांगता करण्यात आली. या मोर्चाचे विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

मराठा समाजाला आरक्षण देताना सध्याच्या ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता तथा ओबीसी किंवा एसईबीसी मध्ये मराठा आरक्षणाचा समावेश करू नये. सोबतच ओबीसीच्या आरक्षणानुसार प्रशासनामध्ये ओबीसीच्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रतिनिधी अत्यल्प असून शासनाच्या होऊ घातलेल्या नोकरभरतीमध्ये सध्या असलेल्या प्रचलित आरक्षणाच्या प्रमाणानुसार भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा शासनाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. या बरोबरच देश व महाराष्ट्रात ओबीसी समाजाच्या बंद असलेल्या सर्व शैक्षणिक शिष्यवृत्त्या पूर्ववत सुरू कराव्या तसेच उच्चशिक्षिन वैद्यकीय शिक्षण सरकारी नोकर भरती व पदोन्नतीमधील ओबीसी प्रवर्गा वरील अन्याय शासनाने दूर करून ओबीसीच्या न्याय हक्काचे संरक्षण करावे. अशा आशयाचे निवेदन ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने निवासी तहसिलदार पवार यांना देण्यात आले.