धनगर समाज आंदोलनाचा बारावा दिवस; गिरीश महाजनांची मध्यस्थी अयशस्वी, दुसऱ्या आंदोलकाचीही तब्येत बिघडली

नगर जिल्ह्यातील चौंडी येथे गेल्या 12 दिवसांपासून धनगर समाजाचे दोन आंदोलक उपोषणाला बसले आहेत. काल शनिवारी एका उपोषणकर्त्याची तब्येत खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर आज दुसऱया उपोषणकर्त्याची तब्येत बिघडली असून, त्यांच्यावर उपोषणस्थळीच उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. मात्र, जोपर्यंत धनगर आरक्षणावर तातडीने धनगर बांधव, संबंधित अधिकारी व मंत्री यांची बैठक होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी त्यांना सुनावले. त्यामुळे मंत्री महाजन यांची मध्यस्थी अयशस्वी झाली.

शनिवारी रात्री मंत्री गिरीश महाजन यांनी उपचार सुरू असलेल्या उपोषणकर्त्याची जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यानंतर चौंडी येथील उपोषणस्थळी पोहोचले व धनगर बांधवांशी चर्चा केली. धनगर समाजाच्या बांधवांनी ग्रामविकासमंत्री महाजन यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी आंदोलक म्हणाले, ‘धनगर समाज 2014मध्ये मोठय़ा अपेक्षेने भाजपसोबत राहिला आहे. आता 11 दिवसांपासून चौंडी येथे आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, तरीही सरकारने या उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असे आंदोलकांनी मंत्री महाजन यांना ठणकाविले. त्यामुळे महाजन यांची मध्यस्थी अयशस्वी झाली.

आज उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांची तब्येत खालावली असून, त्यांच्यावर आंदोलनस्थळी उपचार सुरू केले आहेत. मात्र, तरीही त्यांनी आंदोलनातून माघार न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

20 तारखेला साताऱयात आंदोलन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिह्यातील गावी जाणाऱया खंबाटकी घाटात 20 तारखेला ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. चौंडी येथील बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून, येत्या दोन दिवसांत कोकणात जाणारे रस्ते आणि रेल्वेमार्ग अडविण्याच्या तयारीत धनगर समाजबांधव आहेत.

खासदार संजय राऊत यांच्याकडून आंदोलकांच्या प्रकृतीची फोनवरून चौकशी

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले यशवंत सेनेचे अण्णासाहेब रूपनवर यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी रूपनवर यांच्याशी आज फोनवरून संपर्क साधला. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून धनगर आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी खासदार राऊत यांनी धनगर समाज बांधवांना घटनेत असलेले आरक्षण मिळालेच पाहिजे आणि शिवसेनेचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे व लवकरच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन यावर चर्चा करू, अशी ग्वाही खासदार राऊत यांनी दिली.