ठसा – वीरेंद्रकुमार बहुआयामी व्यक्तिमत्त्व

समाजवादी विचारांचे नेते, धडाडीचे राजकीय नेतृत्व  लेखक, पत्रकार आणि पर्यावरणवादी अशी बहुआयामी ओळख असणारे वीरेंद्रकुमार हे केरळच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नाव. बेधडक कार्यशैलीने त्यांनी आपल्या नेतृत्वाचा मोठा दबदबा निर्माण केला होता. केरळच्या समकालीन राजकारणात त्यांच्या प्रभावी नेतृत्त्वाने वेगळी जागा निर्माण केली. त्यामुळे केवळ एक राजकारणी म्हणून नव्हे, तर समाजाला आपली वाटणारी व्यक्ती हा त्यांचा लौकिक शेवटपर्यंत कायम राहिला. अगदी वयाच्या 80 वर्षांच्या  टप्प्यावरही ते राजकीय व सामाजिक कार्यात सक्रिय होते. व्यापक विचार, आवश्यक कृती आणि त्यासाठी केले जाणारे जाणीवपूर्वक प्रयत्न हीच त्यांच्या कार्याची मुख्य ओळख होती. राजकारणात सक्रिय राहत समाजातील तळागाळातील श्रमिकांच्या प्रश्नांबाबत ते सतत कार्यमग्न राहिले.

वीरेंद्र कुमार यांचा जन्म वायनाड जिल्ह्यातील कल्पेट्टा येथे झाला. त्यांचे प्रारंभिक शिक्षण कल्पेट्टा आणि कोझिकोड येथे झाले. त्यानंतर त्यांनी चेन्नईच्या विवेकानंद महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषयात मास्टर डिग्री आणि अमेरिकेतील ओहियोच्या सिनसिनाटी विद्यापीठातून एम.बी.ए. केले. वायनाडच्या कल्पेट्टामधील  मोफस्सिल या छोट्याशा गावाचा आवाज राष्ट्रीय राजधानीत पोहोचवत आमदार, संसद सदस्य आणि राज्य व केंद्रीय मंत्री होणारे ते पहिले व्यक्ती होते.

वीरेंद्र कुमार यांना जयप्रकाश नारायण यांच्याकडून तत्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्यत्व मिळाले होते आणि तेव्हाच 1968 ते 1970 दरम्यान संयुक्त समाजवादी पक्षाचे अखिल भारतीय कोषाध्यक्ष झाले. त्यानंतर ते जनता दल आणि जनता पक्ष यांचाही एक भाग झाले. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्यासोबतचे आंदोलन आणि आणीबाणीतील तुरुंगवासाने ते अधिक परिपक्व, व्यापक आणि बहुआयामी होत गेले. आणीबाणीच्या वेळी तुरुंगात जात त्यांनी आपला लढा कायम ठेवला. त्यांच्यावर लोकनेते जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. केरळमधील महत्त्वाचे समाजवादी नेते ही त्यांची ओळख होती.

1996 मध्ये ते कोझिकोड येथून लोकसभेवर निवडून गेले. नंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि पुढे एच.डी. देवेगौडा तसेच इंदरकुमार गुजराल यांच्या नेतृत्वातील संयुक्त आघाडी सरकारमध्ये केंद्रीय कामगार राज्यमंत्री झाले. यानंतरही 2004 मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. वीरेंद्र कुमार हे सुरुवातीपासूनच माकपच्या नेतृत्वात डाव्या लोकशाही आघाडीचे सदस्य असले तरी त्यांनी 2009 मध्ये डाव्या नेतृत्वाशी मतभेद झाल्याने कॉंग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीत प्रवेश केला. वीरेंद्र कुमार यांनी नव-भांडवलशाहीच्या उदारवादाला खुलेपणाने आव्हान दिले होते.

केरळच्या समकालीन राजकारणाच्या कुठल्याही नेत्याने त्यांच्याइतके वैविध्यपूर्ण कार्य केले नाही. राजकारणातील आपली दिशा आणि कार्य कायम राखत त्यांनी इतर अनेक प्रांतात वर्चस्व गाजविले. त्यामुळे केवळ एक राजकारणी म्हणून नव्हे, तर समाजाला आपली वाटणारी व्यक्ती हा त्यांचा लौकिक शेवटपर्यंत कायम राहिला. व्यवसाय आणि राजकारण ही दोन्ही क्षेत्रं त्यांनी कायम वेगळी ठेवली.

एक लेखक, चांगला वक्ता, प्रसिद्धी माध्यमांत ठसा उमटवणारे पत्रकार आणि आपली पर्यावरणवादी भूमिका निःपक्षपणे मांडणारे नेते अशी त्यांची ओळख होती. आर्थिक धोरणांना विरोध करत पर्यावरण संरक्षणासाठी लढा देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. हिमालयातील पर्यावरण प्रणालीला धोका निर्माण करणार्‍या  अणुऊर्जा प्रकल्प उभारणीविरूद्ध त्यांनी महत्त्वाचा लढा दिला. नवउदारवादी आणि भांडवलशाही धोरणांचे कट्टर विरोधक असलेल्या वीरेंद्र कुमार यांनी आयुष्यात शेवटपर्यंत  पर्यावरण रक्षणासाठी संघर्ष केला. केंद्रीय कामगार मंत्री म्हणून ते कायम कामगारांच्या हितासाठी उभे राहिले.

सहज लिखाणातून व्यक्त होणं ही त्यांची प्रमुख ओळख. राजकारण, तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्र या विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली. त्यांच्या ‘हिमावथाभूविल’ या प्रवासवर्णनपर पुस्तकाला केंद्र साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला असून इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले. मल्याळम भाषेतील प्रमुख वृत्तपत्र ‘मातृभूमी’चे ते अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकदेखील होते. आपले वर्तमानपत्र केवळ मर्यादित कक्षेत न राहता लोकांचा आवाज बनेल यासाठी ते कायम आग्रही होते. ते प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे तीन वेळा अध्यक्ष होते.

त्यांची राजकारण, तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्र या विषयांवरील पुस्तके प्रसिद्ध आहेत. याबरोबरच हिंदुस्थानातील समाजवादाचा वैचारिक प्रवास विस्तृतपणे मांडणारे लेखन त्यांनी केले. त्यांच्या पुस्तकांना केंद्र व केरळ साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवायही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.

वीरेंद्र कुमार यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला. राजकारण, पत्रकारिता, प्रकाशन आणि तत्त्वज्ञान क्षेत्रातील त्यांची ही बहुविध ओळख कायम स्मरणात राहील.

आपली प्रतिक्रिया द्या