ठसा- शशी भालेकर

773

>> अशोक मुळे

ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि लेखक शशिकांत मुकुंद भालेकर म्हणजे शशी भालेकर, गुरुवारी आपल्यातून निघून गेले. ते श्री शिवाजी मंदिरचे  माजी अध्यक्ष आणि विद्यमान उपाध्यक्ष होते. कलर्स वाहिनीवर 550 पेक्षा अधिक भागांच्या ‘कॉमेडी एक्सप्रेस’ शोचे निर्माता ज्ञानेश भालेकर आणि ‘गीतसुगंध’ या संगीत कार्यक्रमाची सर्वेसर्वा अक्षदा विचारे यांचे ते वडील. लॉक डॉऊन 22 मार्चपासून सुरू झाला तेव्हापासून भालेकर आणि मी रोज सकाळ, संध्याकाळी फोन करून मनसोक्त गप्पांचा फड रंगवून जुन्या आठवणींना उजाळा देत होतो. त्यांनी विजय मर्चंट, माधवराव गडकरी, प्रभाकर पणशीकर आदी 10 व्यक्तीची व्यक्तीचित्रे या कोरोनाच्या उद्विग्न मनास्थितीत लिहिली होती. लॉक डाऊन 22 मार्चपासून सुरू झाला आणि आमचा फोन संवाद वाढत राहिला. आम्ही दोघे रोजच सकाळ, संध्याकाळ फोनवर बोलत होतो. त्यांनी ही सर्व व्यक्तीचित्रे अडीच महिन्यांच्या  कालखंडात मला वाचून दाखविली. त्यात आवश्यक ते बदल करून लेख परिपूर्ण करून हस्तलिखित पूर्ण केले होते. ते पुस्तक आपण प्रकाशित करूया, असं ते मला म्हणत होते. अशावेळी अचानक त्यांनी आपल्यातून निघून जाणे हे माझ्यासाठी धक्कादायक गोष्ट आहे.

त्यांनी आपली पत्रकारिता दैनिक ‘मराठा’मधून सुरू केली होती. तो प्रसंगही गमतीशीर आहे. भालेकर नुकतेच शिक्षण पूर्ण करून फोर्टमध्ये खासगी नोकरी करीत होते. दुपारी जेवणानंतर ते एक राऊंड मारायला ‘अकबर अलीज’ या दुकानासमोरून जात असताना आचार्य अत्रे सुटाबुटात दुकानाच्या बाहेर उभे असलेले त्यांना दिसले. ते थोडावेळ तेथे  उभे राहून त्यांना पाहू लागले. त्यांच्याशी संवाद कसा करावा याचा विचार करीत असताना अत्रेंनी त्यांना जवळ बोलावले आणि विचारलं, तू मला ओळखलंस का? त्यावेळी भालेकर म्हणाले, ‘हो, तुमचं सर्व साहित्य मी वाचलं आहे. आचार्य अत्रेंनी त्यांना विचारले तू काही लिखाण करतोस का? तर ते नाही म्हणाले, पण मला साहित्याची आवड आहे. त्यानंतर अत्रेंनी त्यांना कार्ड दिले आणि वरळीच्या शिवशक्तीत भेटायला सांगितलं. त्यांनी उपसंपादकांना भेटायला सांगून रविवारच्या पुरवणीत सिनेकलाकारांच्या मुलाखती, नाटकाचे परीक्षण करायला सांगितले. भालेकरांना खूप आनंद झाला. ‘मराठा’ दैनिक त्यांच्या घरी यायचे. त्या वर्तमानपत्रात आपल्याला लिहायला मिळतेय  हेच त्यांना महत्वाचे वाटले. ते काम ते आवडीनुसार करायला लागले. त्यांचं हे सातत्य पाहून पुढे श्री साप्ताहिकामध्ये तत्कलीन संपादक सातारकर यांनीही त्यांना लिहितं ठेवलं. पुढे सातारकर यांच्या पत्नी प्रियवंदा सातारकर या ‘प्रियवंदा’ हा दिवाळी अंक काढायच्या. त्यात विजय मर्चंट, अभिनेता प्राण, धर्मेंद्र, यश चोप्रा यांच्यापासून अनेकांच्या मुलखती भालेकरांनी घेतल्या. या व्यक्तींना भेटून त्या वेळचे चित्रपट आणि त्यांच्या भावी वाटचालीतील प्रश्न विचारून रसिकांना अधिकाधिक वास्तवाचे भान करून द्यायचे. त्यांनी कधीही गॉसिप आणि उथळ बातम्या केल्या नाहीत.

1960 आणि 70 चे दशक हा चित्रपट, नाटक, संगीत, भावगीत यासाठीचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. त्या काळात ते,  मी, भाऊ पाध्ये, दिवाकर गंधे भेटत असू. त्यावेळी ‘रसरंग’च्या धर्तीवर अनेक अंक निघत होते. दै. ‘लोकसत्ता’चे विद्याधर गोखले ‘चित्ररंग’, इसाक मुजावर ‘चित्रानंद’ सकाळ जवळील ऑफिस प्रभादेवी येथून अंक काढायचे. अभय पटवर्धन ‘तारांगण’ काढायचे. भाऊ पाध्ये आणि शैला बेल्ले या भवानी शंकर रोडवरील भाऊंच्या पाध्ये वाडीतील ऑफिस मधून ‘झूम’ साप्ताहिक निघायचं. असे अनेक अंक निघत होते. तिथे आम्ही एकत्रच जायचो. आमचे मित्र माधवराव गडकरी हे लोकसत्ताचे संपादक झाल्यावर त्यांनी भालेकर यांना दूरदर्शन, सिनेमा यावर लोकसत्तेत लिहायला सांगितले. तो काळ माझा प्रकाशन व्यवसायाच्या उभारीचा होता. त्या काळात अनेक मित्र  मला मिळाले.

मला वि. पु. भागवत पुरस्कार मिळाला. माझे मित्र श्याम खांडेकर यांनी माझी दूरदर्शनवर मुलाखत घेण्यासाठी शशी भालेकर यांनाच सांगितले. शिवाजी मंदिरच्या मुरारराव राणे आणि चंद्रकांत सावंत उर्पâ अण्णा यांनी त्यांना शिवाजी मंदिरच्या कार्यकारिणीत घेतले.  पुढे ते शिवाजी मंदिरचे अध्यक्ष झाले. आम्ही अनेक नाटकं एकत्र पाहिली. आताही भालेकर आणि मी एकत्र ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ हे नाटक पाहिले.

त्यांच्याबरोबर मी अनेकदा जागतिक मराठी परिषद दिल्ली आणि इतरत्रही अधिवेशनास गेलो. 29 फेब्रुवारी 2020 रोजी जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त साहित्य जल्लोषतर्फे मराठी, अमराठी शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेतली होती. त्या 128 स्पर्धकांचा बक्षिस समारंभ वसईत वर्तक शाळेत आयोजित केला होता. त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून भालेकरांना  बोलवलं होतं आणि 81 व्या वर्षीदेखील ते ट्रेनमधून वसईला आले. तो त्यांचा जाहीर शेवटचा कार्यक्रम ठरला. आठवडयातून दोन दिवस ते शिवाजी मंदिरला ट्रेननेच जायचे. आम्ही काही जण शिवाजी पार्कच्या नारळी बागेत शिरीष पै काव्यकट्टा दरमहा शेवटच्या शनिवारी नवोदित कवींसाठी आयोजित करायचो. पावसाळ्यातील चार महिने हा कार्यक्रम शिवाजी मंदिरच्या राजश्री सभागृहात घ्यायचो. शशी भालेकर यांच्यामुळे ते आम्हाला सवलतीत मिळायचे. दुसर्‍यांना मदत करण्यास शशी भालेकर सतत तत्पर असायचे.

शिवाजी मंदिर संस्थेचा विवाह मंडळ हा उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता. त्यासाठी ते ज्योतिष शिकले आणि पत्रिकेतील गुण वगैरची माहिती ते पालकांना, वरवधू यांना द्यायचे. सतत कार्यमग्न, परोपकारी अशा या माझ्या मोठ्या बंधूच्या जाण्याने केवळ शिवाजी मंदिरचाच नव्हे तर माझ्यासारख्या अनेकांचा मार्गदर्शक, आधार हरपला आहे.

(लेखक डिंपल पाब्लिकेशनचे प्रकाशक आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या