कोरोमंडल एक्प्रेसच्या अपघातात ‘कुणाचा’ तरी हात, सिग्नलला मॅन्युअली बायपास करून लूप लाइनवर पाठवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोमंडल एक्स्प्रेसला ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण अपघाताच्या सीबीआय चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वे सिग्नलच्या स्वयंचलित प्रणालीत छेडछाड झाली आहे का? याचा शोध सीबीआय घेत आहे. ही यंत्रणा ट्रेनचा मार्ग ठरवीत असते. कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघातात कुणाचा तरी हात असून सिग्नलला मॅन्युअली बायपास करून या ट्रेनला लूप लाइनवर पाठवल्याचा सीबीआयला संशय आहे. लूप लाइनवर आधीच एक मालगाडी उभी असल्याने हा भीषण अपघात होऊन त्यात शेकडो प्रवाशांना प्राण गमवावा लागला होता.

रेल्वे सुरक्षा आयोगाने  घटनेच्या जवळ रेल्वे-रोड इंटरसेक्शनवर ट्रफिक थांबवण्यासाठी वापरलेल्या खराब बॅरिअरमधून सिग्नलची अडचण आल्याचा संशय व्यक्त केला. या अडचणी टाळण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेला बायपास केले होते. रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, आवश्यकतेनुसार दुरुस्ती केली जात आहे, परंतु स्वयंचलित प्रणालीशी छेडछाड करण्याची परवानगी नाही. तर अपघाताची कारणे तपासली जात आहेत, असे रेल्वे मंत्रालयाचे मुख्य माहिती अधिकारी अमिताभ शर्मा यांनी सांगितले.

n रेल्वे क्रॉसिंगवरील बॅरिअर तीन महिन्यांपासून खराब असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. बॅरिअरमध्ये जेव्हा काही बिघाड झाला तेव्हा बॅरिअर बंद पडला होता आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी तो हाताने उघडला होता.

काही जण दचकून उठतात, अचानक हसतात, रडतात

या रेल्वे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. काही जण झोपेत दचकून उठतात, काही जण अचानक ओरडायला लागतात, काही हसत आहेत, तर काही जण मोठमोठय़ाने रडायला सुरुवात करतात. काही जखमींना तर झोपच येत नसल्याची तक्रार आहे. या जखमींना कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींचे समुपदेशन करण्यासाठी चार पथके नेमली असून जखमींच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पथकात एक मानसोपचार तज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि जखमींच्या नातेवाईकांचा समावेश आहे.

 अपघातानंतर पाच दिवसांनी कोरोमंडल एक्स्प्रेस पुन्हा एकदा पश्चिम बंगालमधील शालिमार येथून चेन्नईकडे रवाना झाली. मात्र बहनगा रेल्वे स्टेशन सीबीआयने सील केले होते. पुढील आदेश येईपर्यंत या स्थानकावर कोणतीही पॅसेंजर ट्रेन किंवा मालगाडी थांबणार नाही, असे सांगण्यात आल्s. या स्थानकावरून दररोज सुमारे 170 गाडय़ा जात होत्या. अपघातानंतर 7 गाडय़ा थांबल्या होत्या, पण आता एकही ट्रेन थांबणार नाही. तपासादरम्यान ठाण्यातील सर्व कागदपत्रेही सीबीआयने तपासली आहेत. लॉग बुक, रीले पॅनेल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.