आरोग्य केंद्राला टाळे स्टंट नडला: मनसे जिल्हाध्यक्ष चव्हाणसह 15 जणांविरोधात गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

सामना प्रतिनिधी । देवरूख

देवरूख तालुक्यातील कडवई आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा स्टंट मनसेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षांच्या चांगलाच अंगलटी आला आहे. या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी केलेल्या तक्रारीनंतर मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण त्यांचे पत्रकार बंधू मिलींद चव्हाण, मनसेचे उपाध्यक्ष नंदकुमार फडकले यांच्यासह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच विंचूदंश झालेल्या रूग्णावर उपचार करतेवेळी अधिकारी उपस्थित नसल्याच्या कारणावरून मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण आणि सहकार्‍यांनी कडवई आरोग्य केंद्राला टाळे ठोकले. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निवासाची झडती घेऊन त्यातून दारूच्या बाटल्यां समोर आणण्यात आल्या होत्या. जि.प. सदस्य संतोष थेराडे यांच्या मध्यस्तीने हे प्रकरण शांत झाले होते. मात्र जितेंद्र चव्हाण यांनी निवेदनाव्दारे दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी संगमेश्‍वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार जितेंद्र चव्हाण, मिलींद चव्हाण, नंदकुमार फडकले यांनी 10 ते 15 जणांसमवेत कडवई केंद्रात जमावाने अनधिकृत प्रवेश केला. घटनेचे साक्षीदार परिचर माने यांना दमदाटी, शिवीगाळी, धकलाबुकल करत केंद्राला टाळे ठोकले. महिला डॉ. स्वरदा कदम यांना अश्‍लिल शिवीगाळी करून परिचर माने व डॉ कदम यांच्या शासकीय कामात अडथळा आणला. तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानात घुसून व्हरांड्यात जबरदस्तीने दारूच्या रिकाम्या बाटल्या ठेवल्या. यानंतर 30 आक्टोबर रोजी दुपारी 1.30 च्या दरम्याने वैद्यकीय अधिकार्‍यांच्या नियमित कक्षात जात जितेंद्र चव्हाण यांनी अधिकार्‍यांचा शर्ट पकडत धक्काबुक्की केली. यावेळी मिलींद चव्हाण आणि नंदकुमार फडकले यांनी अधिकार्‍यांना शिवागाळी करीत ठार मारण्याची धमकी देत शासकीय कामकाजात अडथळा केल्याचे नमुद केले आहे. यावरून या तिघांसह एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक तिघांनाही आज न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए. एन. पाटील करीत आहेत.