जेवणाच्या थाळीवर सूट देण्याची बतावणी; महिलेला चोरट्यांचा दीड लाखांचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cyber-crime
प्रातिनिधीक फोटो

नामांकित उपाहारगृहातील जेवणाच्या थाळीवर सूट देत असल्याची बतावणी करत चोरट्याने मगरपट्टा सिटी भागातील एका महिलेला 1 लाख 44 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार मगरपट्टा सिटी भागात राहायला आहेत. त्यांच्या मोबाइलवर चोरट्याने संपर्क साधला होता. शहरातील एका नामांकित उपाहारगृहातील थाळीवर सूट देण्यात येणार आहे, अशी बतावणी चोरट्याने महिलेला केली. थाळीची नोंदणी करण्यासाठी एक लिंक पाठवितो, असे चोरट्याने महिलेला सांगितले. चोरट्याने महिलेला पाठविलेल्या लिंकमधून तिच्या बँक खात्याची आणि वैयक्तिक माहिती घेण्यात आली. तसेच महिलेला बोलण्यात गुंतवून चोरट्याने महिलेच्या बँक खात्याची इतर माहिती मिळवली. त्यानंतर महिलेच्या बँक खात्यातून चोरट्याने 1 लाख 44 हजार 497 रुपये लांबविले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक राजू अडागळे अधिक तपास करत आहेत. शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. परदेशातून भेटवस्तू, बँके खाते अद्ययावत करणे, गुंतवणुकीच्या विविध प्रलोभनांसह वेगवेगळ्या प्रकारची बतावणी करत चोरटे नागरिकांना गंडा घालत आहेत. अनोळखी व्यक्तीने संपर्क साधल्यास त्याला वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत सामान्य नागरिक चोरट्यांच्या प्रलोभनांना आणि भूलथापांना बळी पडत असल्याचे दिसून येत आहे.