
सामना प्रतिनिधी । राहुरी
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे एका ठेकेदाराकडून 2 लाख रुपयाची लाच घेणारा मुख्याधिकारी आणि फायरमन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अॅन्टी करप्शन) जाळयात अडकले आहेत. अॅन्टी करप्शन विभागाने ही कारवाई बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास केली आहे. दोन लाखाची लाच स्वीकारताना मुख्याधिकार्यास अटक झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मुख्याधिकारी नानाभाऊ विश्वनाथ महानवर आणि त्यांनी ज्याच्या करवी लाच घेतली तो मुकूंद रामराव मुसमाडे (सहाय्यक फायरमन) सध्या अॅन्टी करप्शनच्या ताब्यात आहेत. त्यांनी एका ठेकेदाराकडे त्याच्या कामास मंजुरी देतो असे सांगून 2 लाखाच्या लाचेची मागणी केली होती. ठेकेदाराला लाच द्यायची नव्हती. म्हणून ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. मुख्याधिकारी नानाभाऊ विश्वनाथ महानवर आणि सहाय्यक फायरमन मुकंद मुसमाडे हे 2 लाखाची लाच मागत असल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्यानंतर अॅन्टी करप्शनच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा येथे सापळा रचला. सरकारी पंचासमक्ष मुख्याधिकारी नानाभाऊ विश्वनाथ महानवर यांनी फायरमन करवी 2 लाखाची लाच स्वीकारली. त्यानंतर अॅन्टी करप्शनच्या पथकाने मुख्याधिकारी नानाभाऊ विश्वनाथ महानवर आणि फायरमनला ताब्यात घेतले आहे.
गेल्या दोन-चार दिवसांमध्ये अॅन्टी करप्शन विभागाने मोठ-मोठया अधिकार्यांना लाच घेताना अटक केली आहे. आज (बुधवारी) मुख्याधिकारी नानाभाऊ विश्वनाथ महानवर देखील अॅन्टी करप्शनच्या जाळयात सापडल्याने शासकीय वर्तुळात देखील चर्चा होत आहे.





























































