ओला उबेरचे दर विमान तिकिटापेक्षा महाग!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सोमवारी मुंबई आणि परिसरावर मुसळधारांनी कोसळणाऱ्या पावसाने मुंबईकरांना झोडपलं. पण, याच पावसाने ओला आणि उबेर टॅक्सी चालकांची मात्र चांगलीच चंगळ केली. ऐन गर्दीच्या वेळी ओला-उबेरने दर इतके वाढवले की, त्या पैशात एखादा माणूस मुंबई ते गोवा फ्लाईटने जाऊ शकेल. पण, ही दरवाढ मुंबईकरांना नवी डोकेदुखी ठरत असून अनेक मुंबईकरांनी या दरांविरोधात तक्रार केली आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी मुंबईसह उपनगरात प्रचंड पाऊस झाला. काळी पिवळी टॅक्सी चालक रस्त्यावर अगदी तुरळक दिसत होते. तर उपनगरात रिक्षाचालकांनी भाड्याला नकार दिला होता. त्यामुळे नाईलाजाने तमाम मुंबईकर ओला-उबेरकडे वळले. मात्र, याच संधीचा फायदा घेत या दोन्ही अॅप्सने भाड्याचा दर तिपटीने वाढवला. त्यामुळे काही ठिकाणी ओला उबेरच्या भाड्याचा दर मुंबई ते गोवा फ्लाईटपेक्षाही महाग ठरला. एका उबेर ग्राहकाला चक्क 1,698 ते 1,947 रुपये इतकं भाडं दाखवत होते. इतक्या किमतीत एखादा माणूस मुंबई ते गोवा असा विमानप्रवास करू शकतो, असं उघड झालं आहे.

दुसरीकडे, ही भाडेवाढ होत असताना अनेक ड्रायव्हर्सनी राईड रद्द केल्याचा फटकाही ग्राहकांना सोसावा लागला. राईड नेमकी कुठे आहे, हे विचारून घेतल्यानंतर अनेक ड्रायव्हर्सनी राईड रद्द केल्यानेही प्रवासी वैतागले. अनेकांनी ओला आणि उबेरला टॅग करत ट्वीटही केलं. पण, दोन्ही अॅप्लिकेशनकडून कोणताही प्रतिसाद आला नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे.