
आपल्याला विविध व्याधी जडल्या असून आता जगून काय उपयोग, असं म्हणत एका वृद्ध दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. या दोघांनी हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार नगर जिल्ह्यातील भिंगार इथल्या द्वारका परिसरामध्ये घडला. जोडप्यामधील नवऱ्याचा मृत्यू झाला असून त्याच्या पत्नीवर सध्या उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उशन्ना रामन्ना वरगंठे ( वय 78 ) असं मयत व्यक्तीचे नाव असून त्यांच्या पत्नी शकुंतला (वय 69 वर्ष) यांच्यावर उपचार सुरू आहे.
द्वारका परिसरामध्ये हे जोडपं गेल्या अनेक वर्षापासून राहत आहे. त्यांना दोन मुले असून एक मुलगा सावेडी परिसरामध्ये राहतो तर दुसरा मुलगा हा पुण्याला राहायला आहे. उशन्ना वरगुंठे यांना कर्करोग झाला होता आणि ते बरेच दिवस आजारी होते. त्यांच्या पत्नी शकुंतला यांना हृदयविकाराने त्रासले होते. बऱ्याच वर्षांपासून दोघांवरही उपचार सुरू होते. दोघांनाही आजार, व्याधी झाल्या असून आता जगून काय उपयोग असा विचार या दाम्पत्याच्या मनात सतत घोळत होता. यामुळे त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता.
उशन्ना यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती ज्यात त्यांनी त्यांचे दु:ख मांडले होते. त्यांनी म्हटले होते की आपल्याला रोगराई झालेली असून दोघांचा जगून काय उपयोग? उशन्ना यांनी पत्नीच्या हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला आणि नंतर स्वत:चीही नस कापून घेतली. दोघेही जण जमिनीवर कोसळले आणि बेशुद्ध झाले होते. शेजारपाजारच्यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना कळवले. पोलिसांनी या दोघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल केले. यातील उशन्ना यांचा रुग्णालयात मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी सुदैवाने बचावल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.































































