मुलांनी दुसरं लग्न करू दिलं नाही, म्हणून वृद्धाची आत्महत्या

596

मुलांनी दुसरं लग्न करू दिलं नाही म्हणून एका 75 वर्षांच्या वृद्धाने आत्महत्या केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात घडली. अरशद असं या वृद्धाचं नाव आहे.

एनडीटीव्ही इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बरेली इथल्या सनौआ येथे अरशद आपल्या आठ मुलांसह राहत होते. त्यांची पत्नी फार पूर्वीच निवर्तली आहे. त्यांच्या आठ मुलांमध्ये पाच मुलगे आणि तीन मुलींचा समावेश आहे. हे सर्वजण विवाहित असून त्यांना मुलं आहेत. गुरुवारी रात्री अरशद यांनी दुसरा विवाह करायची इच्छा असल्याचा विषय मुलांकडे काढला. मात्र, नातवंडं असलेल्या पुरुषाने दुसरं लग्न केलं तर समाजात बदनामी होईल या भीतीने मुलांनी त्यांना विरोध केला. या मुद्द्यावरून अरशद यांचं त्यांच्या मुलांशी भांडण झालं. रागारागात ते आपल्या खोलीत गेले आणि त्यांनी तिथेच गळफास लावून आत्महत्या केली.

ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीला आली. पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात अरशद यांनी फास घेतल्याचं निश्चित झालं.

आपली प्रतिक्रिया द्या